बोल्ड आणि रावडी रूपात तुमच्या भेटीला येणार रिंकू राजगुरू


पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सज्ज झाली असून तिचा ‘कागर’ चित्रपटही निवडणुकांच्या धामधुमीमध्ये येऊन गेला. बॉक्स ऑफिसवर ‘कागर’ला ‘सैराट’प्रमाणे यश मिळाले नसले, तरी यानिमित्ताने तिच्या अभिनयाचे पुन्हा एकदा कौतुक झाले. ती आता ‘मेकअप’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे.

रिंकूचा ‘सैराट’, ‘कागर’ चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटातही बिनधास्त अंदाज दाखवण्यात आला आहे. पण ती या चित्रपटात बोल्ड आणि रावडी रूपात दिसणार आहे. टीजरमध्ये तिच्या हातात बिअरची बाटली दिसते. तसेच खिडकीतून बाहेरच्या जगाशी ती भांडताना दिसते. गणेश पंडीत हे ‘मेकअप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. फक्त रिंकूचीच झलक टीजरमध्ये पाहायला मिळत असल्यामुळे आणखी कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार, हे जाहीर करण्यात आलेले नाही. चाहत्यांना मात्र, तिचा रावडी लूक पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिच्या या भूमिकेला आता प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment