‘या’ दिवसापासून सुरु होणार बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व


मराठी बिग बॉसचे पहिले पर्व छोट्या पडद्यावर चांगलेच रंगले होते. प्रेक्षकांनी पहिल्या पर्वाला चांगला प्रतिसाद दिला होता. बिग बॉस मराठीचे दुसरे पर्वदेखील आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीजरपासूनच या दुसऱ्या पर्वाची चर्चा आहे. कोणते कलाकार यंदाच्या या पर्वात सहभागी होणार, प्रेक्षकांना याचीही आतुरता आहे. अलिकडेच एक पोस्ट महेश मांजरेकरांनी शेअर केली होती. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली होती. त्यांच्या आवाजातील धमाल रॅप आता रिलीज करण्यात आले आहे.

महेश मांजरेकर यांनी एक रॅपचिक गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. ते काय सांगणार आहेत, यावरून याची आतुरता प्रेक्षकांना होती. बिग बॉस मराठीचे टायटल ट्रॅक त्यांच्या आवाजात बनवण्यात आले आहे. ‘खरे की खोटे, जिथे सारे मुखवटे…’ अशांची गोष्ट घेऊन येतोय’, असे कॅप्शन देत त्यांनी या कार्यक्रमाची तारीख जाहीर केली आहे.

बिग बॉसचे दुसरे पर्व २६ मेपासून छोट्या पडद्यावर रंगणार आहे. कोण कोण या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यामध्ये राजकारणी, लावणी कलाकार आणि प्रवचनकार दिसण्याची शक्यता असल्याचा अंदाज प्रेक्षक व्यक्त करत आहेत. आता २६ मेच्या दिवशीच या कलाकारांचा खुलासा होईल. बिग बॉसच्या पहिल्या पर्वात मेघा धाडे ही विजयी ठरली होती. आता दुसऱ्या पर्वात कोण बाजी मारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment