राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार ऑस्करचे अध्यक्ष


आंतराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपट जावा, यासाठी ४ वर्षांपासून राज्य मराठी मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली राज्य शासनाच्या चित्रपट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे. जॉन बेली हे यानिमित्ताने पहिल्यांदाच भारतात येणार आहेत.

यावेळी सिनेमॅटिग्राफर आणि एडिटिंगचे वर्क शॉपही घेण्यात येणार आहे. मुंबईत ऑस्करचे कार्यालय आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे विनोद तावडेंनी यावेळी सांगितले. पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी देखील जॉन बेली हे संवाद साधणार आहेत.

आंतराष्ट्रीय स्तरावर मराठी सिनेमा गेला पाहिजे, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मराठी चित्रपट गोवा आणि कांस फिल्म फेस्टीवलमध्ये गाजले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतही जॉन बेली हे संवाद साधणार आहेत, तसेच मराठी कलाकारांबरोबरही ते वेळ घालवणार आहेत. तसेच येणाऱ्या ५० वर्षात चित्रपटसृष्टी कुठे पोहचणार आहे, यावर देखील चर्चा होणार आहे. या भेटीमुळे मराठी चित्रपट सृष्टीला वेगळी दिशा मिळेल, असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment