खाकीनेच केली कायद्याची ऐशी की तैशी


मुंबई : एखादा नियम किंवा कायदा तोडला तर सर्वसामान्य नागरिकांना दंड किंवा शिक्षा केली जाते. पण जर खाकी वर्दीतला पोलीसच कायद्याची आणि नियमांची एैशी की तैशी करत असेल तर आपण काय करु शकतो? असा सवाल सध्याच्या घडीला उपस्थित केला जात आहे. हेल्मट कुठे आहे, सिग्नल का तोडलात?, असे विचारल्यास ‘तू कोण आहेस?, तुला जाब विचारण्याचा अधिकार नाही, निघ येथून, मी सिग्नल मोडेन, लोकांना उडवेन, तू कोण मला विचारणारा?’, अशा उर्मट पद्धतीने मुंबई पोलीस उपनिरीक्षकाने उत्तर दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबई पोलीस दलातील या पोलीस उपनिरीक्षकाला गणवेश घालून वाहतुकीचे नियम मोडणे चांगलेच महागात पडले आहे. शुक्रवारी मुंबई गोरेगाव परिसरात चक्क एका पोलीसानेच वाहतुकीचे नियम मोडले आणि त्याबद्दल एका सर्वसामान्य बाईकस्वाराने विचारणा केली असता त्या बाईकस्वाराला पोलीसाने उर्मटपणे उत्तरे देत अरेरावी करण्यास सुरूवात केली.

पण त्या बाईकस्वाराच्या हेल्मेटवर लावलेल्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झाला. सोशल मीडियावर या पोलीस उपनिरीक्षकाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हा पोलीस अधिकारी गोत्यात आला. संबंधित पोलिस उपनिरीक्षकाविरोधात विभागीय चौकशी करून कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.


सर्वांसाठी वाहतुकीचे नियम हे सारखेच असल्यामुळे त्यांचे काटेकोरपणे पालन हे व्हायलाय हवे, अशा स्पष्ट सूचना पोलिस आयुक्तांनी सर्व पोलीसांना दिल्या आहेत. पण विना हेल्मेट संबंधित पोलीस उपनिरीक्षक मोटरसायकल चालवत होता. त्याचबरोबर तो दुचाकी चालवताना मोबाईलवरही बोलत होता. याही पुढे जाऊन त्याने सर्रासपणे सिग्नलही तोडले.

मुंबई पोलिसांच्या सशस्त्र विभागात हा उपनिरीक्षक कार्यरत आहे. हेल्मेट न वापरल्याबद्दल, सिग्नल मोडल्याबद्दल ई-चलन पाठवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या गैरवर्तनाबद्दल योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना त्याच्या वरिष्ठांना दिल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment