राजधानीला जोडला जाणार लेडिज स्पेशल डबा


नवी दिल्ली : लेडिज स्पेशल आणि दिव्यांग स्पेशल डबे देशात विविध मार्गांवर धावणाऱ्या शताब्दी, राजधानी आणि दुरंतो सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या प्रत्येक गाड्यांमध्ये सध्याच्या घडीला दोन अपग्रेडेड पॉवर कार (कोच) आहेत. त्यापैकी एक काढून त्याठिकाणी लेडिज आणि दिव्य़ांग स्पेशल डबा लावला जाणार आहे.

संपूर्ण गाडीला प्रीमियम गाड्यांमधील दोन पावर कारच्या माध्यमातून विद्युत पुरवठा केला जातो. वास्तविक पाहता एकाच पावर कोचद्वारे तो केला जातो आणि दुसरा पावर कोच हा बॅकअपसाठी वापरला जातो. मात्र नव्याने लावण्यात येणाऱ्या अपग्रेडेड पावर कारमध्ये फुटबोर्डच्या खालच्या भागात बॅकअप लावले जाणार असल्यामुळे दुसऱ्या पावर कोचची गरज पडणार नाही.

राजधानी, शताब्दी आणि दुरंतो सारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये या माध्यमातून एक नॉन-एसी कोच लागणार असल्यामुळे प्रवाशांना कमी भाड्यात प्रवास करता येईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. तर या सुविधेमुळे महिला आणि दिव्यांगांना प्रवास करणे सोयिस्कर होणार आहे.

Leave a Comment