या दिवशी होणार ‘तारक मेहता..’मध्ये ‘दयाबेन’ची वापसी?


सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेच्या चाहत्यांसाठी लवकरच एक खुशखबर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मालिकेमध्ये ‘दयाबेन’ ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वाकानीने सुमारे दीड वर्षापूर्वी या मालिकेचा तात्पुरता निरोप घेतला होता. दिशाला २०१७ साली कन्यारत्न लाभल्यामुळे तिच्या पालन पोषणासाठी वेळ आवश्यक असल्यामुळे दिशाने या मालिकेतून तात्पुरती रजा घेतली होती. पण त्यानंतर दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही दिशाचे अद्याप मालिकेमध्ये पुरागमन झालेले नाही.

दिशा साकारत असलेली ‘दयाबेन’ या मालिकेचे प्रमुख आकर्षण असून, तिची ही भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली होती. मात्र मालिकेमध्ये परतण्यापूर्वी दिशाच्या काही अटी निर्मात्यांना अमान्य असल्यामुळे दिशा या मालिकेमध्ये परतणार किंवा नाही यावर अनेक तर्क-वितर्क सुरु होते. या शिवाय मालिकेचे मुख्य पात्र फार जास्त काळाकरिता मालिकेमध्ये दिसत नसल्यामुळे मालिकेची प्रसिद्धी कमी होईल अशी चिंता निर्मात्यांना होती. मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी ‘दयाबेन’च्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु असल्याचेही म्हटले होते. त्यावरून बहुधा दिशा या मालिकेमध्ये पुन्हा दिसणार नाही अशीच सर्वसाधारण समजूत झाली होती.

मात्र आता या बाबत नव्याने वृत्त आले असून, दिशा मालिकेमध्ये परतणार असल्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ‘मिड डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिशा आणि मालिकेचे प्रोडक्शन हाउस ‘नीला टेली फिल्म्स’ यांच्यामध्ये चर्चा सुरु असून, दिशाने मालिकेमध्ये परतण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी सध्या परदेशी प्रवास करीत असून, ते भारतामध्ये परतल्यानंतर अठरा मे पासून दिशा मालिकेच्या चित्रीकरणामध्ये सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment