आलिया आणि रणबीरचा विवाह लेक कोमो येथे पार पडणार!


बॉलीवूड अभिनेते रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगत आहे. आलिया आणि रणबीरने ही याबद्दल अनेकदा कधी अप्रत्यक्षरित्या तर कधी प्रत्यक्षरित्या या रिलेशनशिपची कबुली दिली आहे. तेव्हापासून सर्वांचे लक्ष या जोडीकडे लागून राहिले आहे. अशातच रणबीर आणि आलिया इटलीतील लेक कोमो येथे गेले असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच, या ठिकाणी ते कशासाठी आले आहेत, इथे त्यांचा विवाहसोहळा पार पडणार का, अशा अनेक विषयांवर तर्क-वितर्क सुरु झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणवीर सिंह यांचा राजेशाही विवाह मोठ्या थाटाने लेक कोमो येथे पार पडल्यानंतर हे स्थळ चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरले होते.

प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आलिया आणि रणबीर आपल्या व्यस्त शेड्युल्समधून वेळ काढून इटलीतील लेक कोमो येथे जाण्याच्या विचारात होते. रणबीरचे वडील अभिनेते ऋषी कपूर आजारातून बरे झाल्यानंतर त्वरित आलिया आणि रणबीर विवाहबद्ध होणार असल्याचेही म्हटले जात आहे. ऋषी कपूर यांच्या अतिशय जवळच्या मित्राने आणि ऋषी कपूर यांचे बंधू अभिनेते रणधीर कपूर यांनी ही ऋषी आजारातून संपूर्णपणे बरे झाले असल्याशी पोस्ट सोशल मिडीयावर प्रसिद्ध केली होती. ऋषी कपूर यांना कर्करोगाने ग्रासले असल्याचे म्हटले जात असून, त्याच्या उपचारांसाठी ते गेले काही महिने अमेरिकेमध्ये वास्तव्य करून होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर ऋषी कपूर भारतामध्ये परतल्यावर त्वरित आलिया आणि रणबीरचा विवाहसोहळा आयोजित होणार असल्याचे समजते.

अशातच रणबीर आणि आलिया यांचे इटलीला जाणे हे विवाहाच्या तयारीसाठी असल्याचे म्हटले जात आहे. आलिया आणि रणबीर सध्या आपल्या कामांच्या व्यस्त शेड्युल्समधून वेळ काढून युरोपमध्ये फिरायला गेले असून, इटलीतील लेक कोमो या ठिकाणालाही ते भेट देणार असल्याचे समजते.

Leave a Comment