शनिवार-रविवारच्या दिवशी सर्जन म्हणन कार्यरत असतात हे पंतप्रधान


शनिवार-रविवारच्या दिवशी भूतान देशाचे निवासी लोते त्शेरिंग हे बहुतेकवेळी भूतानच्या नॅशनल रेफरल हॉस्पिटलमध्ये सर्जरीमध्ये व्यस्त असतात. अलीकडेच त्शेरिंग यांनी जिग्मे दोर्जी वांगचुक नामक रुग्णावर त्याचे निकामी होत चाललेले ‘युरीनरी ब्लॅडर’ दुरुस्त करण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया केली. शनिवार-रविवारच्या दिवशी सर्जरीमध्ये व्यस्त असलेले लोते त्शेरिंग हे या रुग्णालयात सर्जन म्हणून कार्यरत असले, तरी आठवड्याच्या उरलेल्या दिवशी त्शेरिंग भूतानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी मोठ्या कुशलतेने पार पडत असतात.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या लहानशा देशाचे, लोते त्शेरिंग पंतप्रधान असून, गेल्या वर्षी पंतप्रधान म्हणून बहुमताने भूतानच्या नागरिकांनी त्शेरिंग यांना निवडून दिले होते. २००८ साली भूतानच्या शाही खानदानाचे शासन संपुष्टात येऊन भूतानने लोकशाहीचा स्वीकार केला होता. याच लोकशाहीचे पंतप्रधान म्हणून त्शेरिंग कार्यरत आहेत. त्शेरिंग यांनी वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केले असून, पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळत असताना आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ राहून रुग्णांची सेवा करण्याचे व्रत त्शेरिंग यांनी घेतले आहे.

किंबहुना आपल्या व्यवसायाच्या द्वारे रुग्णांची सेवा करणे हे आपल्याला तणाव रहित करणारे असल्याचे त्शेरिंग म्हणतात. आपल्या मनावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती तिला मिळालेल्या मोकळ्या वेळामध्ये आवडती पुस्तके वाचते, किंवा फिरायला जाते, त्याचप्रमाणे आपल्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आपण रुग्णांची सेवा करीत असल्याचे त्शेरिंग सांगतात. त्शेरिंग यांचे नियमित रुग्णालयामध्ये येणे येथील कर्मचाऱ्यांना आणि रुग्णांना सवयीचे असून, त्शेरिंग आल्यानंतरही रुग्णालयाचे कामकाज नित्याप्रमाणेच सुरु असते. पंतप्रधान येणार म्हणून लोकांची गर्दी, कॅमेऱ्यांचे झगमगते फ्लॅश, कर्मचाऱ्यांची लगबग असे दृश्य येथे पहावयास मिळत नाही. त्शेरिंग आपल्या सवयीप्रमाणे रुग्णालयात येतात, त्यांना नेमून दिलेल्या सर्जरी उरकतात आणि आपली ड्युटी पूर्ण करून परत जातात.

भूतान या देशाने गेल्या काही वर्षांमध्ये इतर प्रगत देशांपेक्षा जरा ‘हटके’ मार्ग स्वीकारला आहे. आर्थिक सुबत्ता किती आहे, तांत्रिक प्रगतीमध्ये देश किती पुढे आहे, यापेक्षा येथील नागरिक स्वयंसिद्ध आणि आनंदी आहेत किंवा नाही, या गोष्टीला शासनाने येथे जास्त महत्व दिले आहे. शिक्षण आणि आरोग्यसेवा या सुविधा सर्व नागरिकांसाठी मोफत असून, या देशामध्ये बेरोजगार आणि बेघर लोक जवळजवळ नाहीतच. ‘ कार्बन फुटप्रिंट’ नसणारा हा जगातील एकमेव देश असून, पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी येथे कडक कायदे अस्तित्वात आहेत. या देशाची राजधानी थिम्फू असून, या देशामध्ये तंबाखू किंवा सिगरेट विक्रीवर बंदी आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या फारशा आहारी न गेलेला, स्वतःच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा रास्त अभिमान असणारा असा हा देश आहे.

Leave a Comment