मुंबईच्या डबेवाल्यांनी ब्रिटन राजघराण्याच्या नव्या राजपुत्रासाठी खरेदी केले दागिणे


मुंबई : ब्रिटनच्या राजघराण्याशी मुंबईच्या डबेवाल्यांचे असलेले नाते आपल्या सगळ्यानांच चांगले माहित आहे. नुकतेच प्रिन्स चार्ल्स पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत. त्यांचे द्वितीय पुत्र प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मर्केल यांना मुलगा झाला आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनाही याचा आनंद झाला असल्यामुळेच डबेवाल्यांनी प्रिन्स चार्ल्स यांच्या नातवासाठी दागिन्यांची खरेदी केली आहे.

आज घाटकोपरच्या सेजल ज्वेलर्स या दुकानातून मुंबईच्या डबेवाल्यांनी दागिने विकत घेतले. या दागिन्यांमध्ये चांदीचे वाळे, पैंजण, कंबरपट्टा, चैन तसेच सोन्याचे हनुमानाचे पेंडटही घेतले आहे. मुंबईच्या डबेवाल्यांनी ही खरेदी महाराष्ट्राची परंपरा आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या तिसऱ्या पिढीशी ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न म्हणून केली आहे.

आम्हाला जगभरात प्रिन्स चार्ल्स यांच्या भेटीमुळे ओळख मिळाली. आम्हाला व आमच्या कामाला प्रसिद्धीच्या झोतात आणणारे प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले आणि राजघराण्याला राजपुत्र मिळाला. याचा आम्हाला आनंद झाला आहे. ज्याप्रमाणे आजोबा आपल्या नातवाला भेट देतात तसेच आमच्या या छोट्या नातवाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही ही भेट पाठवत असल्याचे डबेवाल्यांनी म्हटले आहे. डबेवाले हे सर्व दागिने आज ब्रिटीश काऊन्सिलमध्ये जाऊन देणार आहे. त्यांच्यामार्फत दागिने ब्रिटन राजघराणाच्य नव्या राजपुत्राला मिळतील.

Leave a Comment