व्हायरल; 50 कोटी दिले तर मोदींची हत्या करण्यासही तयार


नवी दिल्ली – दोन वर्षांपूर्वीचा बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तेजबहादूर यादव हे या व्हिडिओत 50 कोटी रुपये दिल्यास मोदींची हत्या करण्यास तयार असल्याचे बोलताना दिसत आहेत. तर व्हिडिओतील व्यक्ती मीच असल्याचे तेजबहादूर यादव यांनी मान्य केले. पण व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा केला आहे.

वाराणसीतून समाजवादी पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रिंगणात उतरलेले सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी १ मे रोजी फेटाळला होता. तेजबहादूर यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असतानाच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

(व्हिडीओ सौजन्य – Breaking TUBE)
तेजबहादूर हे एका व्यक्तीशी या व्हिडिओत गप्पा मारताना दिसत आहे. मला पैसे द्या, मी मोदींची हत्या करण्यास तयार आहे. 50 कोटी रुपये मला द्या, असे तेजबहादूर यादव बोलताना दिसत आहेत. समोरील व्यक्तीने यावर मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि फक्त पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्रच मोदींच्या हत्येसाठी 50 कोटी रुपयांची सुपारी देतील, असे सांगितले. तेजबहादूर यांनी यावर सांगितले की, देशाशी गद्दारी मी करणार नाही. मी असे कोणतेही कृत्य करणार नाही. मला एखाद्या भारतीय व्यक्तीने पैसे दिल्यावरच मी हत्या करण्यासाठी तयार आहे.

तेजबहादूर यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. २०१७ मधील संबंधित व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ दिल्ली पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने शूट केला होता. व्हिडिओ शुटिंग केल्याचे मला माहित नव्हते. संबंधित कॉन्स्टेबलने व्हिडिओशी छेडछाड करुन ते व्हायरल केले, असे तेजबहादूर यांनी म्हटले आहे. पण त्यावेळी नेमकी चर्चा काय झाली होती, याचा तपशील त्यांनी सांगितलेला नाही. त्या कॉन्स्टेबलने गेल्या आठवड्यात माझ्याशी संपर्क साधला होता. ३० लाख रुपये दिले नाही तर त्याने हे खोटे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती, असा आरोप तेजबहादूर यांनी केला. तेजबहादूर यांच्या दाव्यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा, हा संभ्रम कायम आहे.

Leave a Comment