महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरातमध्ये देखील नाईट लाईफ


अहमदाबाद – व्यवसायाच्या नियमात महाराष्ट्राबरोबर उद्योगात स्पर्धा असणाऱ्या गुजरातने मोठा बदल केला आहे. आता २४ तास आणि ७ दिवस गुजरातमधील दुकाने आणि उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. १ मेपासून हा नवीन नियम गुजरातमध्ये अमंलात आलेला आहे.

फेब्रुवारीमध्ये दुकाने व व्यवसाय रात्रीही सुरू ठेवण्याबाबत कायदा गुजरात विधानसभेत संमत झाला होता. १ मे रोजी त्याबाबतची अधिसूचना काढण्यात आल्याचे गुजरात सरकारने म्हटले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील अथवा राष्ट्रीय महामार्गालगतची व्यावसायिक आस्थापना (दुकाने ) ही २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. रेल्वे स्टेशन राज्य परिवहन डेपो, रुग्णालये, पेट्रोल पंप यांच्या लगतची दुकाने यामध्ये २४ ता सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत राज्य महामार्गलगतची आणि महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील दुकाने ही सुरू ठेवता येणार आहेत.

गुजरात दुकाने आणि आस्थापना कायदा १९४८ मध्ये हा नियम लागू करण्यासाठी बदल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास दुकानांना मनाई करण्यात आली होती. नव्या कायद्यानुसार २४ X ७ दुकाने सुरू ठेवण्यासाठी दहाहून अधिक कामगार असलेल्या दुकान अथवा उद्योगांना केवळ एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी दुसऱ्यांदा नुतनीकरण करण्याची गरज लागणार नाही. १० हून अधिक कामगार ज्या दुकानात असतील त्यांना नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

कामगार आणि कर्मचाऱ्यांना रात्री काम केल्यास दुप्पट ओव्हरटाईम दिला जाण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. महिलांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकानामध्ये काम करता येणार आहे. एखाद्या महिलेने लेखी विनंती केल्यास सुरक्षितता पाहून तिला ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त ओव्हरटाईम करता येणार आहे.

Leave a Comment