बॉलीवूड स्टार्स आणि त्यांच्या सुपरकार्स


बॉलीवूडमधील नामवंत हस्तींची खासियत म्हणजे त्यांची राजेशाही जीवनशैली, प्रशस्त बंगले, आणि अर्थातच महागड्या कार्स. केवळ भारतातीलच नाही, तर जगातील सर्वच सेलिब्रिटीजच्या संग्रही अनेक आलिशान गाड्या असून, या सेलिब्रिटीज च्या सोबत त्यांच्या या गाड्याही लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत असतात. अलीकडेच सुप्रसिद्ध बॉलीवूड गायक आणि रॅपर बादशाह याने ‘रोल्स रॉईस रेथ’ ही आलिशान गाडी खरेदी केली असून त्याची आपल्या परिवारासमवेत आणि अर्थातच त्याच्या नव्या गाडीसोबतची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. तब्बल ६.४ कोटी रुपये किंमतीची ही गाडी बादशाहने खरेदी केल्यानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी आणि बादशाहच्या चाहत्यांनी सोशल मिडियाद्वारे त्याचे अभिनंदन केले आहे. मात्र अशा आलिशान गाड्या संग्रही असणारा बादशाह हा एकमेव बॉलीवूड सेलिब्रिटी नाही. बॉलीवूडच्या अनेक सुपरस्टार्सकडे सुपरकार्सचा संग्रह आहे.

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याच्या संग्रही अनेक आलिशान गाड्या असून, त्याच्याकडे असलेली बुगाटी व्हेरॉन ही गाडी सर्वात किंमती असून या गाडीची किंमत बारा कोटी रुपये आहे. आमिर खानच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये आलिशान मर्सीडीस बेन्झ एस 600 या गाडीचा समावेश आहे. या गाडीची किंमत दहा कोटी असून, आमिर व्यतिरिक्त भारतामध्ये केवळ अन्य दोन व्यक्तींच्या ( मुकेश अंबानी, मनमोहन सिंह )संग्रही ही गाडी आहे. २०१६ साली अभिनेता हृतिक रोशन याने आपल्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये ‘रोल्स रॉइस घोस्ट’ ही गाडी समाविष्ट केली आहे. या गाडीचे इंटीरियर्स हृतिकने आपल्या आवडीनुसार डिझाईन करवून घेतले असून, या गाडीची किंमत सात कोटी रुपये आहे. अभिनेता संजय दत्त यांच्या संग्रही फेरारी 599 gtb ही गाडी असून, या गाडीची किंमत ५.५ कोटी रुपये आहे.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या संग्रही रोल्स रॉइस फँटम ही गाडी असून, या गाडीची किंमत ४.५ कोटी रुपये आहे. याशिवाय बच्चन यांच्या संग्रही बेंटली कॉन्टीनेंटल जीटी, मर्सीडीस एसएल५००, रेंज रोवर, लेक्सस एलएक्स ४७०, मेर्सिडीस इ २४०, बीएमडब्ल्यू एक्स ५, बीएमडब्ल्यू सेव्हन सिरीज, आणि मर्सीडीस एस ३२० इत्यादी आलिशान गाड्या आहेत.

Leave a Comment