जाणून घेऊ या भूतान विषयी काही रोचक तथ्ये


आजच्या बदलत्या, प्रगत युगामध्ये जगातील सर्व देश तांत्रिक, वैज्ञानिक प्रगतीसाठी प्रयत्नशील असताना भूतान सारखा लहानसा देश मात्र आपले नागरिक आणि त्यांचे आरोग्य आणि पर्यावरण यावर जास्त भर देत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर हा देश कधीच कोणत्याच बाबतीत फारसा चर्चिला गेलेला नाही. किंबहुना या जगामध्ये अनेक लोक असे ही असतील ज्यांना भूतान नामक देश अस्तित्वात आहे, हेच मुळी ठाऊक नसेल. आजही या देशामध्ये अनेक प्राचीन परंपरांचे कसोशीने पालन केले जाते.

या देशामध्ये तांत्रिक प्रगती हाताबाहेर गेली नसल्यामुळे आजच्या काळामध्येही या देशावर निसर्गाचा वरदहस्त आहे. आणि मुख्य म्हणजे आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले लोक आणि आपले पर्यावरण जपणारा असा हा देश आहे. हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेला आणि भारत व तिबेट यांच्यामध्ये असलेला हा लहानसा देश अलीकडच्या काळामध्ये जगभरातील पर्यटकांना आकर्षित करीत आहे, मात्र या देशामध्ये पर्यटन सर्वांना परवडणारे नाही. या देशामध्ये पर्यटनाला यायचे झाल्यास दिवसाला २५० डॉलर्स प्रती व्यक्ती खर्च येऊ शकतो. बहुधा विदेशी पर्यटकांच्या प्रभावामुळे येथील संस्कृती आणि परंपरा दुषित होऊ नये याचसाठी येथे येणे फारसे स्वस्त नाही.

१९९९ सालापर्यंत भूतान देशामध्ये टीव्ही आणि इंटरनेटवर औपचारिक रित्या बंदी होती. त्यानंतर बदलत्या काळानुरूप भूतानमध्येही आधुनिकीकरण होणे गरजेचे असल्याचे आवश्यक झाल्याने अखेर १९९९ साली भूतानच्या राजांनी देशामध्ये टीव्ही आणि इंटरनेट येण्यास संमती दिली. भूतान देशाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे, याचे मुख्य कारण म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण येथील नागरिकांच्या करिता कायद्याने बंधनकारक आहे. किंबहुना या देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी साठ टक्के भाग हा वनराईचा असला पाहिजे असा कायदा या देशामध्ये अस्तित्वात आहे. आजच्या तारखेला भूतानचा ७५ टक्के भाग हा अरण्यांनी व्यापलेला आहे. भूतानमध्ये पर्यावरण प्रेम हा जीवनाचा महत्वाचा भाग असून, झाडे लावणे आणि झाडे जपणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. २०१६ साली जेव्हा भूतानच्या राजकुमाराचा जन्म झाला, तेव्हा हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी १०८,००० नवे वृक्ष लावण्यात आले. पर्यावरण संरक्षणाच्या प्रती हे नागरिक अतिशय जागरूक असल्याने भूतान हा जगातील एकमेव ‘कार्बन नेगेटिव्ह’ देश ठरला आहे.

भूतान हा तांत्रिक दृष्ट्या फार प्रगत नसला, तरी या देशामध्ये निर्धन लोकांची संख्या अतिशय कमी आहे. जिथे संपूर्ण आशिया खंडामध्ये एकूण जनसंख्येच्या तीस टक्के लोक दरिद्रता रेषेच्या खाली होते, तिथे भूतानमध्ये मात्र एकूण जनसंख्येपैकी केवळ चार टक्के लोक निर्धन होते. भूतानमध्ये ज्या लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध नाही, राहण्यास घर नाही, अशांना राजकोषातून आर्थिक मदत पुरविली जात असते. अशा लोकांना राहण्यासाठी आणि उपजीविकेसाठी जमीन राजाच्या वतीने देण्यात येते. म्हणूनच भूतानमध्ये बेघर लोक जवळपास नाहीतच.

भूतानच्या नागरिकांना आरोग्यसेवा मोफत उपलब्ध असून, पारंपारिक आणि अद्ययावत सुविधा सर्व नागरिकांना मोफत पुरविण्यात येत असतात. या सुविधा भूतानमधील सर्व वीस जिल्ह्यांमधील जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे भूतानच्या नागरिकांना शिक्षणाची सुविधा देखील मोफत पुरविण्यात आली आहे. भूतानमध्ये तंबाखू खाणे किंवा विकणे कायद्याने मना असून, बाहेरून पर्यटनाच्या उद्देशाने आलेल्या पाहुण्यांना ठराविक प्रमाणामध्ये तंबाखू किंवा सिगारेट्स आणता येतात.

मात्र बाहेरून सिगारेट्स आणणे या देशामध्ये परवडण्यासारखे नाही, कारण या देशामध्ये तंबाखू आणि सिगारेट्सवर २०० टक्के कर आकारला जातो. त्याचप्रमाणे या देशामध्ये १९९९ सालापासूनच प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे. येथे दुकानांमधून खरेदी केलेले सामान कापडी पिशव्यांमधून किंवा केळींच्या पानामधून बांधून दिले जाते. असा हा पर्यावरणप्रेमी देश अलीकडच्या काळामध्ये मात्र जगभरातील पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

Leave a Comment