यावेळी भाजपला बहुमत मिळणे अवघड – राम माधव


नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचारातील प्रत्येक सभेत भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे करत असताना, मोदी-शहांच्या दाव्यातील भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी हवा काढली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते राम माधव यांनी भाजप लोकसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजपच्या बहुमताच्या दाव्यावर राम माधव यांच्यासारख्या भाजपमधील दिग्गज नेत्यांनी शंका व्यक्त केल्याने, राजकीय वर्तुळातच आता चर्चांना उधाण आले आहे. तसेच, मोदी-शहांच्या बहुमताच्या दाव्याला राम माधव यांनीच घरचा आहेर दिला आहे.

आम्ही आमच्या ताकदीवर 271 जागांचा आकडा गाठला तरी खूप होईल, असे राम माधव म्हणाले. पण, एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल आणि आम्ही पूर्ण बहुमतात येऊन सत्ता स्थापन करु, असाही विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे. राम माधव यांनी ‘ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत मोदी-शहांच्या बहुमताच्या दाव्याची हवा काढली. भाजपला उत्तर भारतातील ज्या राज्यात 2014 साली विक्रमी जागा मिळाल्या होत्या, तिथे नुकसान होऊ शकते. मात्र, ईशान्य भारतातील राज्य आणि ओदिशा, पश्चिम बंगालमध्ये भाजपला फायदा होईल, असे भाजप नेते राम माधव म्हणाले.

Leave a Comment