जिवंत आहे इसिसचा क्रुरकर्मी म्होरक्या अबू अल बगदादी


तब्बल पाच वर्षानंतर इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याने व्हिडिओ जारी केला आहे. बगदादीने या व्हिडिओनंतर ऑडियो क्लिपही जारी केली असून यात श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांवर त्याने भाष्य केले आहे. बगदादी जुलै २०१४ नंतर पहिल्यांदाच व्हिडिओत दिसला आहे.

सोमवारी बगदादीचा व्हिडिओ इसिस या दहशतवादी संघटनेने जारी केला आहे. बगदादी या व्हिडिओत काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. अत्याधुनिक शस्त्र देखील त्याच्या मागे दिसत आहे. बगदादी हा व्हिडिओत तीन जणांशी बोलत असून त्या तिघांचे चेहरे मात्र दाखवण्यात आलेले नाही. व्हिडिओत बगदादी म्हणतो, बागूजमधील युद्ध संपले आहे, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण इसिस आणि सैन्यात सीरियातील बागूज येथे सुरु असलेले युद्ध गेल्या महिन्यात संपले होते. १८ मिनिटांचा बगदादीचा हा व्हिडिओ असून तो अरबी भाषेत बोलत आहे.

श्रीलंकेतील तुमच्या बांधवानी बागूजमधील रक्तरंजित संघर्षाचा बदला घेतला असल्याचे त्याने व्हिडिओच्या शेवटी जारी करण्यात आलेल्या ऑडियो टेपममध्ये म्हटले आहे. आमचा लढा सुरुच राहणार आणि आम्ही बदला घेणारच, अशी धमकीही त्याने दिली आहे. यापूर्वी २०१४ मध्ये बगदादी मोसूलमधील एका मशिदीत भाषण करतानाचा व्हिडिओ जारी करण्यात आला होता. बगदादीचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त २०१५ मध्ये आणि गेल्या वर्षीही प्रकाशित झाले होते. आता बगदादीचा नवा व्हिडिओ जारी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Comment