आता मोठ्या पडद्यावर धम्माल करणार ‘पोकेमॉन’

pikachu
‘पोकेमॉन’ व्हिडिओ गेम्सचे दिग्दर्शक नाओकी मियाशिता यांनी गेल्या वर्षी ट्विटरच्या माध्यमातून आजवर कार्टून, कॉमिक्स आणि व्हिडीओ गेम्सच्या माध्यमातून मनोरंजन करणाऱ्या ‘पोकेमॉन’ वर आधारित चित्रपटाची अधिकृत घोषणा केली होती. आता त्यांचा हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘द डिटेक्टिव्ह पिकाचू’ असे या कार्टूनपटाचे नाव ठेवण्यात आले असून रॉब लेटरमॅन यांच्यावर त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असुन तो पाच दिवसांत २४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

‘द पोकेमॉन’ या जपानी कार्टूनद्वारे सातत्यपूर्ण कामगिरीतून कार्टून विश्वात आपली मक्तेदारी निर्माण करणाऱ्या ‘डीसी’, ‘माव्‍‌र्हल’ आणि ‘डिस्ने’ला सर्वात प्रथम १९९६ साली आव्हान दिले गेले होते. सुरुवातीला फक्त जपानी व इंग्रजी या दोनच भाषेत केन सुगिमोरी आणि सातोशी तजेरी यांनी निर्माण केलेले हे कार्टून उपलब्ध होते, पण पोकेमॉनची कालांतराने वाढत जाणारी लोकप्रियता पाहता त्याचे हिंदी, लॅटिन, अरबी, पोर्तुगीज, रशियन यांसारख्या इतर भाषांमध्येही अनुवाद करण्यात आला.

‘पोकेमॉन’ हे आज जगातील सर्वात यशस्वी कार्टूनपैकी एक आहे, पण बदलत्या काळानुसार कार्टून स्पर्धकांनी सिनेक्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या बरोबरीने बाजारात टिकून राहायचे असेल तर आता मोठय़ा पडद्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊनच निर्माता निंटेंडो यांनी चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘द डिटेक्टिव्ह पिकाचू’ या चित्रपटाची निर्मिती २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘द ग्रेट डिटेक्टिव्ह पिकाचू’ या व्हिडीओ गेम्सच्या आधारावरच केली जाणार आहे. पण चित्रपटाच्या पटकथेबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिग्दर्शक रॉब लेटरमॅन यांनी दिलेले नाही. तसेच ‘डेडपूल’ फेम रायन रेनॉल्ड्स यातील मुख्य पात्र ‘पिकाचू’ला आवाज देणार असल्यामुळे आजवर केवळ ‘पिकाचू’ हा एकच शब्द उच्चारणाऱ्या पिकाचूचा चित्रपटभर वावर कसा असेल याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे.

Leave a Comment