सध्या जगभरात इजिप्तमधील एका कंपनीने बनवलेल्या नियमाची चर्चा होत आहे. आता इजिप्तच्या कंपनीमधील नियम सर्व कंपन्यांमध्ये लागू करण्याची मागणी अनेक देशातील सरकारकडे करण्यात येत आहे. आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी इजिप्तमधील एका कंपनीकडून प्रत्येक महिन्याला एक दिवसाची भरपगारी सुट्टी देण्यात येण्याचा नियम आहे. ही सुट्टी महिलांना दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीवेळी देण्याचा नियम करण्यात आला आहे. महिला, मुलींना मासिक पाळीदरम्यान मोठ्या दुखण्याला सामोरे जावे लागते. कंपनीकडून त्यासाठी महिन्याला एक भरपगारी सुट्टी देण्याचा नियम करण्यात आला आहे.
ही कंपनी महिलांना त्या दिवसात देते भरपगारी सुट्टी
ब्रिटेनमधील सरकारकडेही इजिप्तच्या या नियमाला पाठिंबा देत याबाबत नियम बनवण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्यात एक दिवस इजिप्तमधील डिजिटल मार्केटिंग एजेन्सी shark and shrimp या कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते. कोणत्याही प्रकारचे मेडिकल सर्टिफिकेट या सुट्टीसाठी देण्याची गरज नसते. या दिवसात महिला कर्मचारी तिला हवे तेव्हा एक दिवस सुट्टी घेऊ शकते.
shark and shrimp कंपनीच्या ह्यूमन रिसोर्स हेड (एचआर) रानिया युसूफ यांनी आमच्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की त्या या सुट्टीच्या सवलतीचा गैरवापर करणार नाही. त्यांना गरज लागेल त्याप्रमाणे दिवस सुट्टी घेऊ शकतात. मासिक पाळीबाबत मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकन देशांमध्ये खुलेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे आमच्या कंपनीने घेतलेल्या या निर्णयाबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जपान, साऊथ कोरिया, तायवान, इंडोनेशिया सारख्या देशात आधीपासूनच मासिक पाळीवेळी सुट्टी देण्याची संकल्पना आहे. भारतातही काही कंपन्या महिलांना पेड ‘मेंस्ट्रुएल लीव’ देतात. मासिक पाळीदरम्यान काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना कंपनीकडून कामाचा अधिक मोबदला काही देशांमध्ये दिला जातो. जाम्बिया या अफ्रिकन देशात २०१५ साली पहिल्यांदा ‘मेंस्ट्रुएल लीव’ची सुरूवात करण्यात आली.
१९४७ पासून जपानमध्ये मासिक पाळीवेळी सुट्टी देण्यात येते. २००१ साली दक्षिण कोरियामधील कंपन्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला. या सुट्टीचा नियम आतापर्यंत कोणत्याही युरोपियन देशात लागू करण्यात आला नाही. ही सुट्टी इटलीमध्ये २०१८ साली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु याला विरोध झाल्यामुळे सुट्टी देण्याच्या निर्णय मागे घेण्यात आला.