आता ताक आणि कैरीचे पन्हे विकणार कोका-कोला

coca-cola
नवी दिल्ली : नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल गेल्या काही वर्षांपासून जागरुकता वाढल्यामुळे कोल्ड ड्रिंक कंपन्यांची झोप उडाली. असल्यामुळेच अनेक कोल्ड ड्रिंक कंपन्यांनी बाजारातील आपली रणनीती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या योजनेनुसार, कोका-कोलासहीत अनेक दिग्गज कंपन्या अनेक वर्षांपासून आरोग्यदायी अशा घरगुती पेयांकडे वळलेल्या दिसत आहेत. यानुसार, तुम्हाला बाजारात आता ‘कोका-कोला’चे जलजीरा, कैरी पन्हे आणि ताक पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कंपनीने उन्हाळ्याची दाहकता तसंच वाढती मागणी लक्षात घेऊन कैरीचे पन्हे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्ड ड्रिंक पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरल्याचे यापूर्वी, समोर आलेल्या अनेक अहवालामध्ये समोर आले आहे. अनेक वापरकर्त्यांनी अशा वेळी कोल्ड ड्रिंक बाजुला केले आहे. पण कैरी पन्हे आणि जलजीरा घरगुती मसाले आणि फळांपासून तयार केले जात असल्यामुळे आरोग्यासाठी ते फायदेशीरच ठरणार आहे. या पेय पदार्थांचीच मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढताना दिसत आहे. एका अहवालानुसार, कोल्ड ड्रिंकच्या तुलनेत ही मागणी तिप्पट आहे.

भारतातील छोटे-छोटे स्टार्टअप जलजीरा आणि कैरी पन्ह्याची विक्री करत आहेत. मागणीत वाढ लक्षात घेता त्यांचेच अनुकरण करत कोका-कोला कंपनीने अगोदरच जलजीरा बाजारात लॉन्च केले आहे. आता कंपनीकडून कैरी पन्हेही बाजारात येत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात ज्युस मार्केट ३.६ अरब डॉलरचा आहे. कंपनीकडून यासाठी आंबा आणि लिचीचे उत्पादनही सुरु करण्यात येणार आहे. कंपनी यासाठी भारतात १.७ अरब डॉलरची गुंतवणूक करणार आहे.