बाप होण्यापूर्वी वजन घटवा

वॉशिंग्टन : तुम्ही मर्यादेपेक्षा अधिक जाड असाल आणि काही दिवसांतच तुम्हाला मूल होणार असेल तर मूल होण्याच्या आत वजन कमी करा अन्यथा तुमची जाडी आणि तिच्यातून उद्भवू पाहणारे मधुमेहासारखे विकार तुमच्या मुलामध्ये उतरण्याची शक्यता आहे. असा इशारा अमेरिकेतल्या एका संशोधकाने दिला आहे. बापाचे गुणधर्म मुलीत उतरण्याची शक्यता जास्त असते असे पूर्वी मानले जाई पण आता करण्यात आलेल्या प्रयोगात हे गुणधर्म आणि अनुवांशिक विकार मुलातसुध्दा उतरण्याची शक्यता असते असे आढळून आले आहे. या संबंधात काही शास्त्रज्ञांनी उंदरावर केलेल्या प्रयोगांमध्ये ही प्रवृत्ती दिसून आली आहे.

अमेरिकेतल्या रॉबिन्सन इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी यासंबंधी प्रयोग केलेले आहेत. त्यांच्यामते तर जाड वडिलांचा मधुमेहाचा आजार केवळ मुलातच नव्हे तर नातवंडातसुध्दा उतरू शकतो. म्हणून बाप होऊ इच्छिणार्‍यांनी विवाहानंतर ताबडतोब आणि पत्नीला दिवस जाण्याच्या आधी आपले वजन आवर्जून कमी केले पाहिजे. त्यांच्या निरीक्षणात आढळलेली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की लठ्ठ पित्याला मधुमेह झालेला नसला तरी तरीही मधुमेह होण्याची शक्यता त्याच्या जनुकात असते आणि त्यामुळे त्याच्या शरीरातला मधुमेह दबलेल्या स्वरूपात राहतो आणि अशा पित्याच्या मुलामध्ये तो व्यक्त होतो.

याचा अर्थ वडिलांना मधुमेह नसला तरी ते मुलाच्या जन्माआधी लठ्ठ होते एवढ्या कारणावरून त्यांच्या मुलामध्ये मधुमेह बळावण्याची शक्यता असते. एकंदरीत पिता होऊ इच्छिणार्‍या तरुणांनी वजनाच्या बाबतीत दक्ष राहिले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment