तापमानबरोबर रंग बदलतो हा हेअर डाय !


आजकाल हेअर डाय हे केवळ अकाली किंवा वयापरत्वे पांढरे झालेले केस लपविण्याचा पर्याय राहिलेला नाही. आणि म्हणूनच केवळ काळा किंवा ब्राऊन रंगच नाही, तर इतर अनेक रंग आपल्या केसांवर आजमाविण्यासाठी लोक तयार असतात. या हेअर डायच्या वापराने पांढरे केस लपतातच, शिवाय तुमचे व्यक्तिमत्वही एकदमच बदलून जाते. त्यामुळे हेअर कलरला बायकांच्या बरोबरीनेच पुरुषही पसंती देऊ लागले आहेत. तसेच तरुण मंडळी आणि वयस्क मंडळी देखील अगदी उत्साहाने हेअर डायच्या नवनवीन ट्रेंड्स आजमावून पहात असतात. आजकाल तर बदलत्या फॅशन ट्रेंडबरोबर हेअर कलरिंगची ट्रेंडही झपाट्याने बदलत आहे.

आता यू के मधील एका कंपनी मार्फत असा हेअर डाय बाजारात आणला गेला आहे, जो सतत बदलत्या तापमानाबरोबर रंगाची छटा बदलतो. या कंपनीचे नाव ‘द अनसीन’ असे असून, या कंपनीच्या द्वारे ‘फायर’ नामक हेअर कलर बाजारात आणला गेला आहे. हा हेअर कलर तापमानाबरोबर दोन वेगळ्या छटांमध्ये बदलू शकतो. यामध्ये अनेक रंग उपलब्ध आहेत, पण तुम्ही कोणत्या प्रकारचा डाय वापरीत आहात, यावर बदलणारा रंग अवलंबून असणार आहे. म्हणजेच एखाद्या हेअर डाय मध्ये निळा आणि पांढरा या दोन रंगांचे कॉम्बिनेशन असेल, तर दुसऱ्यामध्ये काळा आणि पिवळा या रंगांचे कॉम्बिनेशन असेल.

हेअर डायच्या रंगामधील बदल, बदलत्या तापमानावर अवलंबून आहे. म्हणजेच काळा कलर लाल रंगामध्ये बदलण्यासाठी ३१ अंशाचे तापमान असणे आवश्यक आहे. प्रत्येक हेअर डायला रंग बदलण्यासाठी वेगवेगळे तापमान आवश्यक आहे. त्यामुळे काळा रंग लाल रंगामध्ये बदलण्यासाठी जरी ३१ अंशाचे तापमान आवश्यक असले, तरी पांढरा रंग निळ्या रंगामध्ये बदलण्यासाठी १५ अंश तापमान आवश्यक आहे.

अश्या प्रकारचा हेअर डाय वापरून पाहण्याची कल्पना जरी रोचक वाटत असली, तरी हा हेअर डाय केसांसाठी कितपत सुरक्षित असेल, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा हेअर डाय तयार केलेल्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा हेअर डाय अतिशय काळजीपूर्वक, केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही अश्या बेताने तयार करण्यात आला असून, याच्या वापराने केसांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नसल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment