आजमावून पहा मेडीटेशनच्या याही पद्धती

meditation
आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक आणि शारीरिक तणाव सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी शाळेत जाणऱ्या मुलांपासून वयस्क मंडळींपर्यंत सर्वांनाच मानसिक तणावाला ओंड द्यावे लागते. शरीराला पुरेशी विश्रांती मिळाल्यानंतर शारीरिक तणाव, थकवा कमी होत असला, तरी मानसिक तणावाचे ओझे मात्र सहजासहजी कमी होत नाही. हा तणाव कमी करण्यासाठी अनेक लोक अनेक तऱ्हेचे उपाय अवलंबत असतात. यामध्ये मेडीटेशन किंवा ध्यानधारणा हा सर्वात प्रभावी आणि कुठेही, कोणत्याही वेळी अवलंबता येणारा उपाय आहे.
meditation1
मेडिटेशन निरनिरळ्या प्रकारे करता येऊ शकते. अलीकडच्या काळामध्ये सहजगत्या, कुठेही आणि कुठल्याही वेळी करता येतील असे मेडीटेशनचे काही प्रकार विशेष लोकप्रिय होत आहेत. यामध्ये ‘वॉकिंग मेडीटेशन’ हा एक प्रकार असून, घरामध्ये किंवा ऑफिसमधल्या एखाद्या कमी गजबज असलेल्या ठिकाणी हे करता येऊ शकते. यामध्ये आपण अतिशय सावकाश वेगाने चालत असताना पुढे पडत असलेल्या आपल्या प्रत्येक पावलावर आपण आपले लक्ष केंद्रित करायचे असते. यावेळी पावलांची गती अतिशय सावकाश असावी. प्रत्येक पाऊल उचलले जाण्याच्या क्रियेकडे लक्ष केंद्रित असावे. या वेळी आपल्या श्वासोछ्वासावर लक्ष केंद्रित करून फुफ्फुसांमध्ये भरणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या वायूवरही लक्ष केंद्रित करायचे आहे. सुरुवातीला आपल्याला या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे काहीसे अवघड वाटते, मनामध्ये असंख्य विचारही सुरु असतात, पण सरावाने केवळ आपल्या चालण्याकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होते.
meditation2
मेडीटेशन करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे ‘बॉडी स्कॅन’. यामध्ये आपले लक्ष आपल्या संपूर्ण शरीरावर केंद्रित करायचे असते. हे मेडीटेशन करण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी बसावे, आणि दीर्घ, खोल श्वासोछ्वास करावा. आपल्या पावलांपासून डोक्यापर्यंत पाळीपाळीने सर्व अवयवांवर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येक अवयवाची हालचाल जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक अवयवामध्ये होत असणाऱ्या प्राणवायूच्या संचारणावर लक्ष केंद्रित करावे.
meditation3
तिसऱ्या प्रकारच्या मेडीटेशनला ‘मेत्ता’ किंवा ‘लव्हिंग काईंडनेस मेडीटेशन’ म्हटले गेले आहे. स्वतःच्या प्रती आणि आपल्या आसपास असणाऱ्या सर्व प्राणिमात्रांच्या प्रती मनामध्ये दयाभाव आणि प्रेमभाव असला तर मनावरील तणाव आपोआप कमी होत असल्याच्या तत्वाचे मूळ या ध्यानधारणेमध्ये आहे. इतरांवर कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थाविना प्रेम करणे या ध्यानधारणेचे प्रमुख तत्व आहे. त्यामुळे एखाद्या शांत ठिकाणी बसून आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करून केले जाणारे हे मेडीटेशन करताना इतरांच्या प्रती आपल्या मनामध्ये असलेले असमाधान, ईर्ष्या, मत्सर, राग इत्यादी नकारात्मक भावना दूर करून त्या जागी केवळ सकरात्मक भावना उत्पन्न करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. केवळ इतरांसाठीच्याच नाही तर स्वतःबद्दलच्या नकारात्मक भावनाही दूर करण्याचा प्रयत्न या मेडीटेशनच्या दरम्यान करायचा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment