राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 15 मिनिट गुफ्तगू

raj-thakre
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाली असून सध्याच्या राजकीय घडामोडींवर या भेटीत चर्चा झाल्याचे वृत्त असून या नेत्यांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी रंगशारदा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी यावेळी मोदी आणि शहामुक्त भारतासाठी भाजपविरोधात मतदान करा, त्याचा फायदा कोणाला होतो याचा विचार करु नका, असे सूचक विधान केले होते.

राज ठाकरे यांनी या मेळाव्यानंतर बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली असून जवळपास १५ मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे अनेक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. राज ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडताच, अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे समजते.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीगाठीचे प्रमाण वाढले असून राज ठाकरेंनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत असो, एकत्र केलेला विमान प्रवास असो किंवा अजित पवारांनी महाआघाडीत मनसेला सामील करण्याबाबत घेतलेली भूमिका असो, मनसे आणि राष्ट्रवादीमधील जवळीक वाढताना दिसत आहे. यात भर म्हणजे मनसेने लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले असून ते राष्ट्रवादीला पाठिंबा देणार की काय, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे.

Leave a Comment