हे आहेत योगसाधनेचे निरनिराळे प्रकार


उत्तम आरोग्य, योग्य शारीरिक पोश्चर आणि शरीरातील मासपेशींची, स्नायूंची लवचिकता आणि बळकटी वाढावी, एकाग्रता वाढावी, मन शांत राहावे, शरीरावरील आणि मनावरील ताण कमी व्हावा, हार्मोन्सचे कार्य सुरळीत चालावे, ह्या आणि अश्या इतर कारणांस्तव योगसाधना केवळ भारतातच नाही, तर इतर देशांमध्येही लोकप्रिय होत आहे. योगसाधनेमुळे शरीराला मिळणारे लाभ सर्वमान्य आहेत. योगसाधना अनेक प्रकारे केली जाऊ शकते. ज्यांनी नुकतेच योग करण्यास सुरुवात केली आहे, त्यांना नेमके कुठल्या पद्धतीने योग केले जावे हे समजणे आवश्यक आहे. योगसाधनेचे निरनिराळे प्रकार समजून घेऊन आपल्याला आवडेल आणि साजेल असा प्रकार निवडून त्यानुसार योग करणे श्रेयस्कर आहे. तसेच आपण योगसाधना कोणत्या कारणास्तव करणार आहोत- म्हणजे वजन घटविण्यासाठी, मनावरील ताण कमी करण्यासाठी, शारीरिक वेदना कमी करण्यासाठी, किंवा इतर कोणत्या कारणासाठी, ह्याचा विचार करणे ही आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्यासाठी कोणत्या प्रकारची योगसाधना योग्य असेल याचा निर्णय, तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावा.

योगासने करताना घ्या ह्या गोष्टींची खबरदारी


हठ योग ह्या योगपद्धतीमध्ये शारीरिक व्यायामाचा भाग जास्त असून, अष्टांग आणि ऐयंगार ह्या दोन्ही योग पद्धतींचा समावेश आहे. ह्यामध्ये शारीरिक हालचाल जास्त आहे. तसेच ह्यामध्ये आसने अतिशय धीम्या गतीने केली जातात. ह्यामध्ये आसनातील प्रयेक पोश्चर काही ठराविक अवधीकरिता रोखून धरायचे असते. ह्यामध्ये ध्यानधारणा आणि योग्य श्वसन क्रियेला मोठे महत्व आहे. ह्यामध्ये शरीर आणि मन तणावमुक्त करण्याकरिता काही खास टेक्निक्सचा ही समावेश आहे. अष्टांग योगपद्धतीमध्ये शारीरिक श्रम जास्त आहेत. त्यामुळे ज्यांनी नुकतेच योग सुरु केले आहे, आणि तत्पूर्वी कधीही कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला नाही, त्यांनी ह्या पद्धतीचा अवलंब करू नये. ह्यामध्ये निरनिरळ्या प्रकाराने केले जाणरे सूर्यनमस्कार, आणि इतर अनेक आसनांचा समावेश आहे. ह्या पद्धतीमध्ये निपुण होण्यासाठी अनेक वर्षांचा सराव असावा लागतो.

योगाचार्य बीकेएस ऐयंगार ह्यांनी प्रचलित केलेली पद्धत त्यांच्या नावाने, म्हणजेच ऐयंगार योगपद्धती ह्या नावाने प्रचलित आहे. ह्याचा उपयोग मुख्यतः सांधेदुखीचा विकार असणाऱ्यांना किंवा कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा, वेदना कमी करण्यासाठी जास्त केला जातो. ह्यामध्ये शरीराची अचूक अलाईनमेंट, आणि अचूक पद्धतीने केलेल्या हालचालींवर जास्त भर दिला जातो. ह्या हालचाली करीत असताना श्वासावर नियंत्रण ठेवणे अतिशय महत्वाचे असते. ह्यामध्ये निरनिरळ्या साधनांचा उपयोग होतो. लाकडी ठोकळे, जाड ब्लँकेटच्या घड्या, ह्यांचा ह्यामध्ये उपयोग केला जातो. ह्या योग पद्धतीमुळे स्नायूंना बळकटी येऊन, त्यातील लवचिकता आणि ताकद वाढते. विन्यास योग ही अष्टांग पद्धती प्रमाणे आहे. यामध्ये देखील योग्य श्वसन करीत केलेल्या शारीरिक हालचालींवर जास्त भर आहे. ह्या हालचाली जलद गतीने करावयाच्या असतात. शरीराचे उत्तम टोनिंग होण्याकरिता विन्यास आणि अष्टांग योगपद्धती चांगल्या आहेत.

कुंडलिनी योगामध्ये आध्यात्मिक साधनेचा भाग जास्त आहे. ही योग पद्धती अतिशय अवघड असून, ह्याचा ताण शरीरावर आणि तितकाच मनावर जाणवू शकतो. ह्यामध्ये ध्यानधारणा, मंत्रोच्चारण, मुद्रा आणि श्वसनक्रिया आहेत. शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी ही साधना केली जाते. ह्यामध्ये शरीराच्या हालचाली अतिशय जलद गतीने करावयाच्या असून ह्यामध्ये शरीराच्या अतंर्गत जाणीवांवर लक्ष केंद्रित करावयाचे असते. ज्यांना नियमित शारीरिक व्यायामापेक्षा अधिक काही करण्याची इच्छा असते, आणि ज्यांचा अध्यात्माकडे जास्त कल असतो, त्यांनी ही योग पद्धती अवलंबावी.

योगपद्धती कोणत्याही प्रकारची असो, ती तज्ञांच्या निरीक्षणाखाली अवलंबणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपण करीत असलेली साधना सर्वप्रकारे योग्य असेल. ह्या योगपद्धतींच्या शिवाय बिक्रम योग, ‘हॉट’ योग, कृपाळू योग अश्या अनेक योगपद्धती आहेत.

आरोग्यदायी भोजनासाठी लक्षात घ्यावी आयुर्वेदातील तत्वे

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही