योगासने करताना घ्या ह्या गोष्टींची खबरदारी


आजकालच्या आपल्या घाई गडबडीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःला फिट ठेवण्याचा पर्याय निवडत असतो. त्या दृष्टीने आजकाल योग करण्याचा पर्याय खूपच लोकप्रिय होत आहे. ह्याचे मुख्य कारण असे, की योगासने हा व्यायाम कोणालाही, कोणत्याही वयामध्ये करता येण्यासारखा आहे. पण योग करण्यास सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. जर योग करीत असताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या नाहीत, तर त्यातून शरीराला अपाय होण्याची शक्यता उद्भवू शकते.

योगासनांना सुरुवात करण्यापूर्वी ‘वॉर्म अप’ करणे आवश्यक आहे. त्यामुळे योगासने सुरु करण्यापूर्वी हलका व्यायाम करावा, जेणेकरून शरीरातील स्नायू जरा लवचिक होतील. ह्यामध्ये हातांच्या आणि पायांच्या सांध्यांच्या हालचाली, कंबर, आणि पाठीच्या स्नायूंच्या हालचाली करणे आवश्यक आहे. स्नायूंमधील कडकपणा कमी झाल्यानंतर मगच योगासनांना सुरुवात करावी. योगासने करण्यापूर्वी किमान तीन तास आधी जेवण केलेले असावे. जेवल्यानंतर लगेच योगासने करू नयेत. तसेच योगासने करीत असताना मध्ये मध्ये खूप पाणी पिणे टाळावे. रिकाम्या पोटी योगासने करून त्यानंतर अर्ध्या तासाने भोजन करणे हा पर्यायही अवलंबिला जाऊ शकतो.

योगासने करताना जर सतत तहान लागत असेल, तर थंडगार, फ्रीजमधील पाणी पिऊ नये. सामान्य तापमान असलेले पाणी घोट घोट पिणे चांगले. तसेच एका वेळी खूप पाणी पिऊ नये. योगासने करीत असताना शरीराचे तापमान वाढलेले असते. त्यामुळे अचानक फ्रीजमधील पाणी प्यायल्याने सर्दी, घसा खराब होणे अश्या समस्या उद्भवू शकतात. योगासनांना सुरुवात करताना सोप्या आसनांपासून करावी आणि हळू हळू आसनांची ‘डिफीकल्टी लेव्हल’ वाढवत न्यावी. म्हणजे सोप्या आसनांपासून सुरुवात करून हळू हळू अवघड आसनांकडे वळावे. जर आसने करण्याची सवय नसेल, तर सुरुवातीलाच अवघड आसने केल्याने स्नायूंवर ताण येण्याची शक्यता असते.

योगासने करण्यापूर्वी आपल्यासाठी कुठली आसने योग्य ठरतील ह्याचा सल्ला योग प्रशिक्षकांकडून घेणे आवश्यक आहे. आपल्या प्रशिक्षकांना आपल्याला असलेले आजार, तब्येतीच्या इतर किरकोळ तक्रारी, ह्याबद्दल जरुर सांगावे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या साठी योग्य आसने कोणती आणि ती कशी केली जावीत ह्याचे मार्गदर्शन करणे प्रशिक्षकांना सोपे जाते. त्यामुळे योगासने करताना इतरांचे अनुकरण करण्याच्या ऐवजी, प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार योग केल्याने लाभ होईल. योगासने केल्यानंतर त्वरित भोजन करणे किंवा स्नान करणे टाळावे. स्नान करावयाचे असल्यास योगासने झाल्यानंतर अर्ध्या तासाने करावे. तसेच योगासने करताना आपले मन, चित्त एकाग्र करून आपण करीत असलेल्या आसनांवर लक्ष केंद्रित असणे गरजेचे असते. त्यामुळे योगासने करताना इतरांशी गप्पा मारणे, फोन वर बोलणे, फोनवरील मेसेजेस पहाणे आवर्जून टाळायला हवे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment