मेघन मार्कलसारखे दिसण्यासाठी महिलेले प्लास्टिक सर्जरीवर खर्चिले १७ लाख रुपये !

meghan-markel
आपल्या आवडत्या सेलिब्रिटी सारखे आपण दिसावे अशी इच्छा अनेकांची असते. मग त्यासाठी आवडती सेलिब्रिटी वापरते तशा प्रकारचे पोशाख, हेअरस्टाईल अशा माध्यमांतून थोडेफार आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसारखे दिसण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत असतात. पण काहींना एखाद्या सेलिब्रिटीबद्दल इतके आकर्षण असते, की आपण हुबेहूब आपल्या आवडत्या सेलिब्रिटी सारखे दिसावे यासाठी काहीही करण्यासाठी ही चाहतेमंडळी मागेपुढे पहात नाहीत. टेक्सास मध्ये राहणाऱ्या एका महिलेने देखील मेघन मार्कल सारखे दिसण्याच्या इच्छेपायी वारेमाप पैसे खर्च केले आहेतच, पण त्याशिवाय अनेक प्लास्टिक सर्जरी देखील करून घेतल्या आहेत.

क्सोशायटल ग्रीयर नामक या महिलेने मेघन मार्कल सारखे दिसण्यासाठी अनेकदा प्लास्टिक सर्जरी करवून घेतली असून त्यासाठी तिने तब्बल १९,००० पाउंड्स, म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे १७ लाख रुपये खर्च केले आहेत. या सर्व शस्त्रक्रियांचा आपल्याला अतिशय फायदा झाला असून, आपण हुबेहूब मेघन सारखे दिसत असल्याचे ग्रीयरचे म्हणणे आहे. आपण शस्त्रक्रिया केल्यानंतर मेघन सारखे दिसत असल्याचे सांगून तिने आपली छायाचित्रे सोशल मिडीयावरही पोस्ट केली आहेत. मात्र नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियांच्या द्वारे तिचा हा भ्रम दूर केला असून तिच्यामध्ये आणि मेघनमध्ये अजिबातच साम्य नसल्याचे मत नेटकऱ्यांनी ठासून व्यक्त केले आहे.

मेघनसारखे दिसण्यासाठी ग्रीयरने लायपोसक्शन, ऱ्हायनोप्लास्टी, डोळ्यांच्या खाली ‘फिलर्स’, ओठाच्या आसपास ‘फिलर्स’, ओठांमध्ये ‘फिलर्स’, आणि बोटॉक्सची अगणित इंजेक्शन्स इत्यादींचा वापर केला असल्याचे समजते. या सर्व सर्जरीच्या नंतर ग्रीयर अतिशय आनंदी असून आता आपल्यात आणि मेघनमध्ये खूपच साम्य असल्याचे समाधान तिने व्यक्त केले आहे.

Leave a Comment