राहुल गांधींची मुक्ताफळे – काँग्रेसचा बुडत्याचा पाय खोलात

rahul-gandhi
सतराव्या लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे आणि इतक्यातच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या विरोधकांच्या हाती कोलीत दिले आहे. कुख्यात दहशतवादी मसूद अझहर याचा सन्मानजनक उल्लेख करून राहुल गांधी यांनी आपण राजकारणात अजूनही अपरिपक्व आहोत, हे दाखवून दिले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाचा फायदा घेतला नसता तरच आश्चर्य होते. केंद्रीय मंत्री स्मृती इरणींपासून रविशंकर प्रसाद यांच्यापर्यंत अनेकांनी राहुल यांना धारेवर धरले. एकीकडे प्रचाराच्या मुद्द्यासाठी चाचपडत असलेल्या काँग्रेसच्या दृष्टीने हे म्हणजे बुडत्याचा पाय खोलात असेच झाले आहे.

पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर भ्याड हल्ला घडवून आणणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेविषयी देशभरात अजूनही संतापाची भावना आहे. या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेला मसूद अझहर हा भारताच्या प्रमुख शत्रूंपैकी एक आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र या दहशतवाद्याचा उल्लेख आदरार्थी करत आहेत, हे दृश्य अजिबात खपणारे नाही. तेही ऐन निवडणुकीच्या प्रचारात! दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या प्रचार सभेत राहुल यांनी मसूदचा उल्लेख चक्क ‘मसूद अझहरजी’ असा केला. त्यांच्या या मुक्ताफळांनी काँग्रेसजनांची मात्र गोची केली आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्याचा बदला म्हणून भारतातर्फे पाकिस्तानात शिरून बालाकोट येथे हवाई हल्ले करण्यात आले. तेव्हा संपूर्ण देशाने एकजूट होऊन भारतीय लष्कराच्या जवानांना सलाम केला होता. लष्कराच्या जवानांचे कौतुक करण्यामध्ये काँग्रेससोबत सर्व राजकीय पक्ष आणि नागरिक सहभागी होते. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी आपण भारत सरकारच्या सोबत आहोत, अशी हमी त्यावेळी सर्वांनी दिली होती. अर्थात काँग्रेसने थोडासा हात आखडता घेत थेट सरकारचे अभिनंदन करण्याऐवजी हवाई दलाच्या वैमानिकांच्या बहादुरीचे कौतुक केले होते. एक राजकीय पक्ष म्हणून ते समजण्यासारखे होते. मात्र राहुल यांच्या ताज्या वक्तव्यामुळे त्या भूमिकेला हरताळ फासला गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष एकामागोमाग एक चूक करत आहे. आधी बालाकोटमधील हवाई हल्लयांसाठी अभिनंदन करणाऱ्या काँग्रेसने या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याचे पुरावे मागायला सुरुवात केली. काँग्रेसचे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी तर ‘हवाई दलाने माणसे मारली की झाडांवरच ग्रंथ टाकले’ असा प्रश्न विचारून या कारवाईची टिंगल केली. मात्र राहुल गांधी त्यांना आवरताना दिसले नाहीत. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे नेते बी.के. हरिप्रसाद यांनी पुलवामातील हल्ला व बालाकोटची कारवाई हे दोन्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला. त्यांनाही आवरताना काँग्रेस पक्षाने प्रयत्न केलेला दिसला नाही.

काँग्रेसच्या सुरात सूर मिसळून अन्य विरोधी पक्षांनीही या कारवाईवर शंका घ्यायला सुरवात केली. हे हवाई हल्ले व त्यात झालेल्या नुकसानीचे पुरावे मागायला त्यांनी सुरुवात केली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्या वक्तव्यांना पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरले. पाकिस्तानात त्यांना हिरो करण्यात आले. अखेर या शंकासूरांन गप्प करण्यासाठी खुद्द हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानच्या पाडलेल्या एफ-16 विमानाचे अवशेष दाखवावे लागले. यापेक्षा वाईट काय असू शकते?

खरेतर सर्वच पक्षांनी देशहिताच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यात राजकारण न आणण्याची गोष्ट केली तरी प्रत्यक्षात त्यांनी राजकारण केलेच. पुलवामा हल्ला आणि त्यानंतरची कारवाई यांचे राजकीय भांडवल भाजपनेही केले. मात्र लष्कराच्या संदर्भात राजकारण करण्याच्या बाबतीत भाजप आणि अन्य पक्षांमध्ये खूप अंतर आहे. निवडणुकांमध्ये लष्करी कारवाईचा फायदा घेण्यासाठी भाजपने त्याला देशहित आणि राष्ट्रवादाचे स्वरूप दिले आहे. याच्या उलट काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष या कारवाईचे पुरावे मागून आपण पाकिस्तानच्या बाजूने उभे असल्याचे चित्र निर्माण करत आहेत.

भारताच्या विरोधात पाकिस्तानने एक छुपे युद्ध पुकारले आहे. गेल्या सत्तर वर्षांत भारताविरुद्ध सतत खोड्या करणाऱ्या पाकिस्तानबद्दल भारतीय जनतेत रोष आहे.इतकेच काय तर पाकिस्तानबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांबद्दलही भारतीयांना राग आहे. अशा परिस्थितीत दहशतवाद्यांवर स्तुतीसुमने उधळून राहुल गांधी यांनी काय साधले? ऐन निवडणूक प्रचाराच्या आरंभाला त्यांनी फुलटॉस दिला आहे. त्यावर भाजपची मंडली षटकार न ठोकती तरच नवल!

Leave a Comment