‘तारक मेहता…’फेम भव्य गांधीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

bhavya-gandhi
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘टपू’ची भूमिका अजरामर केलेला बालकलाकार भव्य गांधी याने काही काळापूर्वी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. इतर मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका करण्याची इच्छा असल्याने भव्यने ही मालिका सोडली होती. आता दोन वर्षांच्या कालावधी नंतर भव्यचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. टीव्हीवर लवकरच प्रसारित होणार असलेल्या ‘शादी के सियाप्पे’ या मालिकेमध्ये भव्य एका परग्रहवासियाची, म्हणजेच एका एलियनची भूमिका साकरणार आहे.

भव्यने छोट्या पडद्यावरील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात २००८ साली ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेद्वारे केली. या मालिकेमध्ये भव्यने ‘टपू’ची भूमिका साकारली होती. भव्यने साकारलेल्या या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता लाभली. या भूमिकेसाठी भव्यला २०१० ते २०१६ या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक पुरस्कारही मिळाले. त्यानंतर भव्यने ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडून चित्रपटांमध्ये अभिनय करण्याचा निर्णय घेतला. दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्ट्रायकर’ या बॉलीवूड चित्रपटामध्ये भव्य दिसला. त्यानंतर भव्यने दोन गुजराती चित्रपटही केले.

‘तारक मेहता..’ या मालिकेमध्ये नऊ वर्षे काम केल्यानंतर २०१७ साली भव्यने या मालिकेचा निरोप घेतला. आता दोन वर्षे उलटून गेल्यानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी भव्य पुन्हा तयार होत असून, ‘शादी के सियाप्पे’ या मालिकेमध्ये भव्य दिसणार आहे. या मालिकेमध्ये भव्य, कॉमिक रोलमध्ये दिसणार आहे. भव्य या मालिकेमध्ये एका एलियनची भूमिका साकारणार असून, या मालिकेची काही छायाचित्रे त्याने सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.

Leave a Comment