‘क्रुझ’वर यात्रेकरूचा अकस्मात मृत्यू, परिवाराला मिळणार एवढी नुकसानभरपाई

cruise
रॉयल कॅरीबियन क्रुझेस या अमेरिकन कंपनीचे प्रवासी जहाज अलास्काकडे जात असताना या जहाजावर प्रवास करणाऱ्या रिचर्ड पुचाल्स्की नामक यात्रेकरूचे अकस्मात निधन झाले. जहाजावर उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय दलाला रिचर्डच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमागचे कारण समजून घेता आले नसून, त्याच्यावर अयोग्य उपचार केले गेल्याने रिचर्डचा मृत्यू झाला असल्याचे अमेरिकतील मायॅमी न्यायालयाने म्हटले आहे. वेळीच उपचार न केले गेल्याने यात्रेकरूचा मृत्यू झाला असल्याने यासाठी रॉयल कॅरीबियन क्रुझेस या कंपनीला जबाबदार ठरवून या कंपनीने रिचर्डच्या परिवाराला ३.३८ मिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

२०१६ साली रिचर्ड पुचाल्स्की आपल्या परिवारासमवेत रॉयल कॅरिबियन क्रुझेसच्या ‘एक्सप्लोअरर ऑफ द सीज’ या क्रुझ शिपमधून प्रवास करीत असताना त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनतर रिचर्डने त्वरित जहाजावरील मेडिकल सेंटरमध्ये जाऊन तेथे उपस्थित असणाऱ्या वैद्यकीय तज्ञांना आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितले. वास्तविक रिचर्डला हृदयविकाराचा झटका येत असल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र हे तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय तज्ञांच्या लक्षात आले नाही, आणि त्यांनी तात्पुरती काही औषधे देऊन रिचर्डला परत पाठवून दिले. त्यानंतर रिचर्डची तब्येत आणखीनच बिघडून त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले.

रिचर्डचे निधन झाल्यानंतर त्याच्या परिवाराने जहाजावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय तज्ञांच्या निष्काळजीपणबद्दल तक्रार दाखल केली असता, पुढील चौकशीचे आदेश कोर्टाने दिले होते. चौकशीअंती सर्व घटनांचा उलगडा झाल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय तज्ञांच्या निष्काळजीपणामुळेच रिचर्डला प्राणाला मुकावे लागले असल्याचे सांगून त्यासाठी रॉयल कॅरीबियन क्रुझेस या कंपनीला रिचर्डच्या परिवाराला ३.३८ मिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment