‘गली बॉय’चा सिक्वेल लवकरच, म्हणते झोया अख्तर

gullyboy
अभिनेता रणवीर सिंह याने साकारलेल्या ‘गली बॉय’या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच येणार असल्याचे चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तरने म्हटले आहे. भारतीय ‘स्ट्रीट रॅपर्स’ डिव्हाईन आणि नेझी यांच्यावर आधारित ‘गली बॉय’ हा चित्रपट असून, या चित्रपटाची गीते आणि संगीत याच जोडीचे आहे. या चित्रपटामध्ये रणवीरने ‘मुराद अहमद’ नामक रॅपरची भूमिका साकारली आहे. समाजातील अनेक समस्या इतरांपुढे आपल्या आगळ्या रॅप संगीताच्या द्वारे पोहोचवत, त्यातून प्रचंड लोकप्रियता मिळविली असलेला मुराद रणवीरने साकारला आहे.

आपल्या देशामध्ये हिप हॉप संगीत जरी लोकप्रिय होत असले, तरी या प्रकारच्या संगीताबद्दल फारशी चर्चा होत नसल्याने या विषयाशी निगडित जाणून घेण्यासारखे बरेच काही असून हेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला आणि चित्रपटाच्या कथानकाच्या लेखिका रीमा कागती यांचा मानस असल्याचे झोया म्हणते. त्याचमुळे याच हिप हॉप कल्चरवर आधारित आणखी एक चित्रपट आपण लवकरच सादर करणार असल्याचे झोयाने सांगितले. ‘गली बॉय’ च्या सिक्वलमध्ये झोयाचा भाऊ अभिनेता फरहान अख्तर सहभागी होणार नसून, या चित्रपटाच्या कथानकामधे फरहान चपखल बसत नसल्याची खंत झोया आणि फरहान दोघांनाही असल्याचे समजते.

फरहानच्या ‘रॉक ऑन’ चित्रपटामध्ये फरहानने साकारलेला रॉक स्टार ‘गली बॉय’ पेक्षा खूपच वेगळा असल्याने फरहानला ‘गली बॉय’मध्ये पाहून कदाचित प्रेक्षक निराश होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भूमिकेसाठी फरहानची निवड न करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे झोया म्हणते. झोयाने दिग्दर्शित केलेल्या इतर सर्वच चित्रपटांमध्ये फरहानने भूमिका केल्या आहेत. ‘गली बॉय’मध्ये नायिकेची भूमिका आलिया भट्टने केली असून, या चित्रपटामध्ये सिद्धांत चतुर्वेदी, कल्की कोचलिन, विजय राज इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘गली बॉय’ ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून, या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १३६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Leave a Comment