डेनिश राजनिवास ‘अमालियेनबोर्ग’ला २२५ वर्षे पूर्ण

danish1
कोपनहेगन येथे असलेल्या भव्य आणि अतिशय देखण्या ‘अमालियेनबोर्ग पॅलेस’ या डेन्मार्कच्या राजपरिवाराच्या औपचारिक निवासस्थानाला २२५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून, १७९४ सालापासून हे डेन्मार्कच्या राजपरिवाराचे निवासस्थान आहे. २२५ वर्षांपूर्वी, त्याकाळी राजपरिवाराचे औपचारिक निवासस्थान असलेल्या क्रिस्टीयनबोर्ग पॅलेसला लागलेल्या भीषण आगीमध्ये राजवाड्याचे मोठे नुकसान झाल्यानंतर डेन्मार्कचे तत्कालीन राजे क्रिस्टीयन (सातवे) यांनी अमालियेनबोर्ग पॅलेसमध्ये स्थलांतर केले. सुरुवातीला हा बदल तात्पुरता असला, तरी त्यानंतर राजपरिवार येथेच कायमस्वरूपी स्थायिक झाला. तेव्हापासून आजतागायत आठ निरनिराळे राज्यकर्ते व त्यांचे परिवार या महालामध्ये राहिले आहेत.
danish
अमालियेनबोर्ग येथे चार राजवाड्यांचे संकुल असून, यांचे निर्माणकार्य १७५० साली सुरु झाले. राजे क्रिस्टीयन यांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राजे फ्रेडरिक (पाचवे) यांनी या अमालियेनबोर्ग पॅलेसचे निर्माण करविले. हे संकुल संपूर्णपणे तयार होण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला, आणि त्यानंतर सुमारे तीस वर्षांच्या नंतर राजपरिवार येथे कायमस्वरूपी स्थायिक झाला. चार राजवाड्यांच्या या संकुलामध्ये क्रिस्टीयन (सातवे) पॅलेस, क्रिस्टीयन (आठवे) पॅलेस, फ्रेडरिक (आठवे) पॅलेस आणि क्रिस्टीयन (नववे) पॅलेस या राजवाड्यांचा समावेश आहे. यामधील फ्रेडरिक पॅलेसमध्ये सध्याचे राज्यकर्ते क्राऊन प्रिन्स फ्रेडरिक आणि क्राऊन प्रिन्सेस मेरी यांचा निवास असून, डेन्मार्कची राणी मारग्रेथ, क्रिस्टीयन (नववे) पॅलेस मध्ये रहात आहे.
danish2
अमालियेनबोर्ग पॅलेस अनेक ऐतिहासिक घटनांची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे. अनेक राजांचे राज्याभिषेक, अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहण्यासोबतच १९४० साली जर्मन सैन्याच्या आक्रमणाला देखील या राजवाड्याने तोंड दिले आहे. १९४४ साली झालेल्या युद्धाच्या खुणा आजही या राजवाड्याच्या भिंतींवर पहावयास मिळतात. अलीकडच्या काळामध्ये राणी मारग्रेथ हिच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिनानिमित्त मोठा समारंभ या राजवाड्यामध्ये पार पडला होता. या राजवाड्याला २२५ वर्षे पूर्णझाल्यानिमित्त येथे घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचा एक व्हिडियोदेखील शाही परिवारातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे.