ज्वेलरी शोरूममधून उंदीराने केली ‘हाय प्रोफाईल’ चोरी

rat
एखादा उंदीर घरामध्ये दिसला, तर तो शोधून काढून त्याला घराबाहेर काढेपर्यंत आपल्याला जीव नकोसा होतो. घरामध्ये उंदीर असला, तर तो कधी कोणत्या वस्तूचे नुकसान करीत याचा काही नेम नसतो. पण बिहारची राजधानी पटना येथील एका दागिन्यांच्या दुकानामध्ये उंदीरानी केलेला कारनामा ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तसे बिहारचे उंदीर निरनिराळे ‘कारनामे’ करण्यासाठी आधीपासूनच प्रसिद्ध असून, एकदा एका गोदामामध्ये ठेवलेली दारूही या उंदीरांनी गायब केली असल्याचे वृत्त काही काळापूर्वी प्रसिद्ध झाले होते, तर एक मोठा बांध वाहून जाण्यासाठी ही उंदीर जबाबदार असल्याचे म्हटले गेले होते.
rat1
दागिन्यांची ही ‘हाय प्रोफाईल’ चोरी उंदीराने केली, ती पटनामधील एका नामांकित ज्वेलरी शोरूममध्ये. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर अतिशय मौल्यवान अशी हिऱ्यांची कर्णभूषणे दुकानातील शोकेसमधून गायब झाल्याचे दुकानाच्या मालकाच्या लक्षात आले. पण दुकानामध्ये कोणी जबरदस्ती घुसले असल्याचे न आढळल्यामुळे, व त्याचबरोबर इतर कोणतेही दागिने गायब नसल्याचे निदर्शनाला आल्यामुळे दुकानाचे मालक आणि कर्मचारी आणखीनच गोंधळात पडले. अखेरीस दुकानामध्ये असलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासून पाहिले तर काही समजू शकेल हे लक्षात येताच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.
rat2
सीसीटीव्ही फुटेजमध्ये हिऱ्याची कर्णभूषणे लंपास करणाऱ्या ‘चोराला’ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हा चोर दुसरा तिसरा कोणी नसून, चक्क एक उंदीर होता. उंदीराने दुकानातील काऊंटरवरून शोकेस मध्ये प्रवेश केला आणि त्यामध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेली हिऱ्याची कर्णभूषणे काढून घेऊन हा उंदीर तिथून पसार झाल्याचे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. पुष्कळ शोध घेऊन देखील हिरेजडीत कर्णभूषणे घेऊन उंदीर नेमका कुठे पसार झाला असावा याचा शोध अद्याप लागलेला नाही.

Leave a Comment