उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांकडून शिक्कामोर्तब

udyanraje-bhosale
सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली आहे. हा निर्णय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर या बैठकीत स्थानिक नेत्यांमधील सर्व वाद संपुष्टात आल्यामुळे आता साताऱ्यातून निवडणूक लढवण्याचा उदयनराजे भोसले यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

उदयनराजे यांना साताऱ्यातून पुन्हा उमेदवारी देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा स्थानिक नेत्यांशी फटकून वागत असल्यामुळे जोरदार विरोध होता. उदयनराजे त्यामुळे विरोधी गटाने सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचे नाव उमेदवारीसाठी उचलून धरले होते. उदयनराजे भोसले यांनीही यानंतर दगाफटका झाल्यास बघून घेईन, असा इशारा दिला होता.

उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक मध्यंतरीच्या काळात वाढली होती. उदयनराजे त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. उदयनराजे भोसले यांनी पाटण येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सूचक विधानही केले होते. माझे लग्न महिन्याभरात आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचेच लग्न आहे. तेव्हा अक्षता टाका, संपल्या म्हणू नका, असे म्हटल्यामुळे शरद पवार उदयनराजेंबाबत काय निर्णय घेणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर शरद पवार यांनी उदयनराजेंच्या पारड्यात दान टाकत त्यांना पुन्हा एकदा साताऱ्याची सुभेदारी बहाल केली आहे.

Leave a Comment