अमोल कोल्हेंच्या प्रस्तावित उमेदवारीला विलास लांडे समर्थकांचा विरोध

amol-kolhe
पुणे: शिवबंधन तोडून घड्याळ बांधलेल्या अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा नव्या वादाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अमोल कोल्हेंच्या प्रवेशाने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. अमोल कोल्हेंच्या प्रस्तावित उमेदवारीला माजी आमदार विलास लांडे समर्थकांनी विरोध केला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली, तर आम्ही काम करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला. अमोल कोल्हेंना शिरुर येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध करत विलास लांडे यांनाच तिकीट देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

शिरुर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आजपर्यंत सलग तीनवेळा शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले आहेत. आता हा मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांना उतरवणार असल्याचे सांगितले जात आहे. जर तसे झाले तर शिरुरमध्ये तगडी लढत पाहायला मिळू शकते.

मात्र शिवसेनेतून आलेल्या अमोल कोल्हेंना लोकसभेचे तिकीट देण्यास विलास लांडे समर्थकांनी विरोध केला आहे. उपरा उमेदवार आम्हाला नको. विलास लांडे यांना उमेदवारी द्या, असा हट्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या मतदारसंघात अमोल कोल्हेंना तिकीट मिळण्याच्या शक्यतेमुळे लांडे समर्थक तसेच नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. त्याचबरोबर अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत लांडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment