महिला पोलीस कर्मचाऱ्याचे जुळले गँँगस्टरशी सूत, गमवावी लागली नोकरी

constable
‘प्रेम आंधळे असते’ अशी म्हण अनेकांच्या बाबतीत सत्यात उतरत असते. जर व्यक्ती एखाद्याच्या प्रेमात पडली, तर सारासारविचारबुद्धी बाजूला ठेवली जाते आणि संपूर्ण विचारशक्ती केवळ आपल्या प्रेमभावनेवर केंद्रित होते. अशा वेळी आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो ती व्यक्ती जगातील सर्वात चांगली व्यक्ती असून, त्या व्यक्तीसाठी वाटेल ते करण्यासाठी तयार असणाऱ्या प्रेमवीरांचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. बिहार मधील भागलपूर पोलीस स्थानकामध्ये तैनात असलेली महिला पोलीस कर्मचारी प्रीती कुमारी हिची प्रेमकथा देखील एखाद्या बॉलीवूड चित्रपटाचे कथानक शोभेल अशी आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रीती सीतामढी येथील पोलीस खात्यामध्ये तैनात होती. तेव्हा तिचे सूत मिठू साहा नामक एका इसमाशी जुळले. विशेष गोष्ट अशी, की मिठू साहा त्या प्रांतातील ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगारांपैकी एक असल्याची पूर्ण कल्पना प्रीतीला होती. सीतामढी पोलीस लाईन्सच्या परिसरामध्ये दोघांच्या चोरून भेटीगाठी सुरु झाल्या. मिठूच्या व्यक्तिमत्वाने, आणि तथाकथित ‘धाडसी’ जीवनशैलीने प्रीतीला भुरळ घातली, आणि या दोघांनी एका मंदिरामध्ये जाऊन गुपचूप लग्न ही करून घेतले.

सीतामढी पोलीस खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांनी या संबंधी चौकशीचे आदेश दिले. चौकशीच्या दरम्यान प्रीती आणि मिठू साहा यांचे प्रेमसंबंध असून यांनी विवाहही केला असल्याचे उघडकीला आलेच, पण त्याचबरोबर पोलीस खात्याच्या अनेक गुप्त कारवायांची माहिती देखील प्रीती मिठू साहाला सातत्याने पुरवीत असल्याचेही उघड झाले. या बाबतीत स्पष्टीकरण देण्यासाठी प्रीतीला बोलाविले गेले असता, आपल्या वर्तनाचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण ती देऊ शकली नाही.

गुन्ह्याला आळा घालणे हे पोलिसांचे कर्तव्य असून, जर पोलिसच गुन्हेगाराशी संधान जुळवू लागले, तर गुन्ह्याला आळा घालणे कठीण होईल असे स्पष्टीकरण देत प्रीतीने एका गँगस्टरशी संधान जुळवून पोलीस खात्याची प्रतिमा देखील मलीन केली असल्याकारणाने प्रीतीला नोकरीतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment