‘संजीवनी’ वनस्पतीच्या शोधार्थ उत्तराखंड सरकार खर्च करणार पंचवीस कोटी रुपये

medicine
रामायणाच्या कथेमध्ये, मेघनादाचा बाण लागून लक्ष्मण मूर्च्छित झाले आणि त्याला शुद्धीवर आणण्यासाठी केवळ ‘संजीवनी’ वनस्पती उपयोगी ठरू शकेल हे समजल्यानंतर ही दिव्य औषधी शोधण्यासाठी हनुमान निघाले. द्रोणागिरी पर्वतावर ही औषधी सापडेल याची माहिती मारुतीरायांना असली, तरी द्रोणागिरीवर पोहोचल्यानंतर ही औषधी त्यांना नेमकी ओळखता येईना. त्यामुळे जास्त वेळ वाया न दवडता हनुमंतांनी संपूर्ण द्रोणागिरी उचलून आणला. त्यानंतर त्यावर असलेल्या संजीवनी औषधीने लक्ष्मण शुद्धीवर आले, अशी एकंदर सर्व कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. आता याच ‘संजीवनी’ औषधीचा शोध पुनश्च घेण्याचे काम उत्तराखंड सरकार हाती घेणार असल्याचे वृत्त आहे. उत्तराखंड सरकारच्या अधीन असलेल्या ‘मिनिस्ट्री ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन’ या मंत्रालयातर्फे ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी तब्बल पंचवीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
medicine3
पण काहींच्या बाबतीत ही योजना राबविण्यात अडचण येणार असून, मुळात संजीवनी नामक दिव्य औषधी खरेच अस्तिवात आहे किंवा नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण इतके वर्षांमध्ये अनेक शास्त्रज्ञ, आयुर्वेदाचर्य यांनी अनेक प्रयत्न करूनही या दिव्य औषधीचा शोध लावण्यात त्यांना अपयशच आले होते. मात्र या वनस्पतीच्या शोधार्थ उत्तराखंड सरकारच्या वतीने चीनच्या सीमेनजीक हिमालयामध्ये असलेल्या द्रोणागिरी पर्वतराजीच्या आसपास रिसर्च टीम्स पाठविण्यात येणार असल्याचे समजते. किंबहुना या टीम्सना ही दिव्य औषधी शोधून काढण्यात यश मिळणार असून, या औषधीच्या वापराने अनेक प्राणघातक विकारांवर उपाय करता येणे शक्य होणार असल्याची खात्री सरकारच्या वतीने व्यक्त केली जात आहे.
medicine1
आयुर्वेदातील उपचारपद्धती भारतामध्येच नाही, तर पाश्चात्य देशांमध्येही अतिशय लोकप्रिय ठरत असून, या उपचारपद्धतीचा लाभ अनेक दुर्धर रोगांमध्ये देखील होताना पहिला जात आहे. याच उपचारपद्धतीचा प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विशेष ‘आयुष’ मंत्रालयाची स्थापनाही केली गेली आहे. संजीवनी वनस्पती शोधण्याच्या उद्देशाने मोहीम राबविण्यासाठी मात्र केंद्रीय ‘आयुष’ मंत्रालयाकडून अर्थसहाय्य न मिळाल्याने उत्तराखंड सरकारने स्वतःच्याच खर्चाने ही मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.

Leave a Comment