विजयवाडा येथील व्यापाऱ्याच्या खात्यामध्ये रहस्यमय रित्या तब्बल अठरा कोटी रुपये जमा

candy
विजयवाडा येथे राहणारे सी किशोर लाल, चॉकोलेट विक्रीचा व्यवसाय करतात. घरोघरी जाऊन आपल्याकडील चॉकोलेट्स विकून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा चरितार्थ चालतो. किशोर लाल यांनी काही दिवसांपूर्वीच रेणुकामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडीट सोसायटी येथे आपले खाते उघडले होते. या क्रेडीट सोसायटीची मूळ शाखा गुजरात येथील अहमदाबाद मध्ये आहे. खाते उघडल्याच्या काही दिवसांनंतर किशोर लाल यांना आयकर खात्याकडून नोटीस आली. ही नोटीस कशाच्या संदर्भात आहे याचा नीटसा उलगडा न झाल्याने जेव्हा किशोर लाल यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा धक्का देणारी हकीकत त्यांच्या समोर आली.

किशोर लाल यांच्या खात्यामधून वारंवार पैशांचे व्यवहार होत असून, अलीकडेच किशोर लाल यांच्या खात्यामध्ये तब्बल अठरा कोटी रुपये जमा केले गेले होते. मात्र इतके पैसे आपल्या खात्यामध्ये जमा आहेत, किंवा आपल्या खात्यातून पैशांचे व्यवहार वारंवार केले जात असल्याची किशोर लाल यांना गंधवार्ता देखील नव्हती. अखेरीस आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर आणि त्या संबंधी आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता सर्व प्रकारचा उलगडा किशोर लाल यांना झाला.

या सर्व प्रकाराच्या नंतर आपल्या खात्यामध्ये आलेले पैसे कुठून आले याची आपल्याला सुतराम कल्पना नसल्याचे किशोर लाल यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आयकर विभागाकडून अधिक चौकशी केली गेल्यानंतर किशोर लाल यांचे उत्पन्नाचे साधन मर्यादित असून, इतर कुठून किंवा कोणाकडून त्यांना ही रक्कम प्राप्त झाली नसल्याचे निदान आयकर विभागातर्फे करण्यात आले. त्यामुळे किशोर लाल यांच्या खात्यामध्ये इतकी मोठी रक्कम आली कशी या रहस्यावरील पडदा कायम असून, आयकर विभागातर्फे अधिक चौकशी केली जात असल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment