पोलीस अधिकाऱ्याचे धक्कादायक वर्तन, वृद्ध पित्याचे मृत शरीर महिनाभर घरातच !

ayurveda1

घरातील आजारी व्यक्तीला बरे करण्यासाठी जादूटोणा, मंत्र तंत्र केले जाण्याची पद्धत भारतामध्येच नव्हे, तर इतरही अनेक देशांमध्ये आढळते. मात्र अलीकडेच भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये घडलेल्या एका घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. याबाबतीत विशेष गोष्ट अशी, की या घटनेचा संबंध मध्यप्रदेश मधील एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याशी असून, या अधिकाऱ्याचे धक्कादायक वर्तन सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले आहे.

ayurveda
आपल्या वृद्ध पित्याचे देहावसान झाल्यानंतरही सुमारे एक महिना पित्याचा मृतदेह घरामध्येच ठेऊन त्यावर ‘आयुर्वेदिक’ उपचार करवून, त्या उपचारांच्या द्वारे आपल्या मृत पित्याला बरे करण्याचा प्रयत्न आपण करीत असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. या अधिकाऱ्याच्या वडिलांचे निधन सुमारे एक महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने, एका खासगी रुग्णालयामध्ये झाले होते.

या पोलीस अधिकाऱ्याच्या घराच्या बाहेर चौकीदारी करणारे दोन सिक्युरिटी गार्ड्स, त्या घरातून सातत्याने येणाऱ्या भयंकर दुर्गंधीमुळे आजारी झाल्यानंतर या संबंधी चौकशी केली गेली असता खरा प्रकार उघडकीला आला. या प्रकाराची अधिक चौकशी केली असता या घरामध्ये राहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने एका महिन्यापूर्वी मरण पावलेल्या आपल्या वडिलांचे मृत शरीर अद्यापही घरामध्येच ठेवले असून, ते शरीर सडू लागल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याचे निदान झाले. हे वृत्त समजताच संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या घराबाहेर बघ्यांची, प्रसारमाध्यमांची गर्दी उसळली.

संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या वडिलांना १३ जानेवारी रोजी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्या पुढच्या दिवशीच त्यांचे निधन झाले. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मृत वडिलांचे शव घरी आणून त्यावर ‘आयुर्वेदिक’ उपचार सुरु करविले. या उपचारांचा चांगला परिणाम आपल्या वडिलांवर दिसून येत असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. मात्र उपचारांच्या नावाखाली या घरामध्ये अनेक चित्रविचित्र प्रकार सुरु असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या लोकांच्या म्हणण्यानुसार या अधिकाऱ्याच्या घरी मांत्रिकांचे सातत्याने येणे जाणे सुरु असून, घरातील नोकरांना त्यांच्या चेहऱ्यांवर विचित्र ‘मास्क’ घालून वावरतानाही पाहिले गेले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

या संदर्भात ज्या इस्पितळामध्ये या अधिकाऱ्याच्या वडिलांचे निधन झाले तिथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्सशी संपर्क साधला असता, त्यांनी ही अधिकाऱ्याच्या वडिलांचे निधन एक महिन्यापूर्वी झाले असल्याचे म्हटले आहे. मात्र ही गोष्ट अमान्य करीत ‘आयुर्वेदिक’ उपचारांनीच आपले वडील संपूर्णपणे बरे होणार असल्याची आपल्याला खात्री असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याचे असे धक्कादायक वर्तन लोकांच्या चर्चेला विषय ठरत आहे.

Leave a Comment