‘या’ चित्रपटांवर झालेल्या खर्चामुळे निर्मात्यांचे निघाले दिवाळे

film
भारतीय चित्रसृष्टी निर्माण झाली त्याला आता एका शतकाहूनही अधिक काळ उलटून गेला आहे. या काळामध्ये चित्रपटांचे रूप सातत्याने पालटत राहिले, आणि या चित्रसृष्टीचे रूपांतर पाहता पाहता ‘बॉलीवूड’मध्ये झाले. या बॉलीवूडने आजतागायत एका पेक्षा एक असे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. यांपैकी अनेक चित्रपट ऑस्कर सारख्या मोठ्या पुरस्कारासाठी नामांकित झाले, तर अनेक चित्रपट इतके भाव-दिव्य होते, की ते पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आजच्या काळामध्ये एखादा चित्रपट बनविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतात. हे चित्रपट बनविण्यामध्ये अनेकदा या चित्रपटांचे निर्माते आपले सर्वस्व पणाला लावतात. हे चित्रपट बॉक्स ऑफिस वर यशस्वी झाले तर त्यासाठी खर्च झालेले पैसे भरून निघतातच, पण त्याशिवाय मोठा नफा देखील होतो. मात्र चित्रपट जर दर्शकांनी स्वीकारला नाही, तर निर्मात्यांना होणारे आर्थिक नुकसानही मोठे असते. बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट असे होऊन गेले आहेत, ज्यावर झालेल्या खर्चामुळे आणि इतके करूनही यातील काही चित्रपट अयशस्वी ठरल्याने निर्मात्यांचे दिवाळे निघाले आहे.
film1
हिंदी चित्रसृष्टीतील सर्वप्रथम भव्य-दिव्य, आलिशान चित्रपट म्हणून ‘मुघल-ए-आजम’ आपणा सर्वांनाच परिचित आहे. १९६० च्या दशकातील हा सर्वात महागडा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी करीमुद्दिन आसिफ यांनी आपल्याकडील सर्वच पैसा या चित्रपटामध्ये गुंतविला होता. हा चित्रपट पूर्ण होण्यास चौदा वर्षांचा कालावधी लागला असून, त्या काळी सुमारे दीड कोटी रुपये या चित्रपटावर खर्च करण्यात आले. १९६० साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या काळामध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये हा चित्रपट यशस्वीही ठरला. भव्य सेट, उत्तम दिग्दर्शन आणि सुश्राव्य संगीत यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मृतीत आहे. पण हा चित्रपट बनवीत असताना मात्र के आसिफ यांच्याकडील सर्वच पैसा खर्च होऊन गेला होता.
film2
राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट बहुचर्चित असला, तरी बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाने अपयश पाहिले. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी राज कपूर यांना त्यांची पुष्कळशी प्रॉपर्टी आणि स्टुडियो गहाण ठेऊन पैसा उभा करावा लागला होता. राज कपूर यांच्या निधनानंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला, आणि तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्यानंतर या चित्रपटावर झालेल्या खर्चामुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यात कपूर खानदान यशस्वी ठरले.
film3
अभिनेता गोविंदा, रवीना टंडन आणि महिमा चौधरी यांच्या भूमिका असलेला ‘सँडविच’ या चित्रपटाला देखील आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन यांचा ‘जमानत’ हा चित्रपट बनविण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्या शिवाय करिष्मा कपूर आणि अर्शद वारसी यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटाचे बजेट त्या काळी वीस कोटी रुपयांचे होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडल्याने निर्मात्यांना मोठ्या आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागले होते.
film4
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सारा अली खानचा पहिला चित्रपट ‘केदारनाथ’मध्ये साराच्या अभिनयाला दर्शकांचे खूप कौतुक लाभले असले, तरी चित्रीकरणाच्या दरम्यान या चित्रपटालाही आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. या चित्रपटाला आर्थिक साहाय्य पुरवत असलेल्या कंपन्यांपैकी एका कंपनीने या चित्रपटामधून आपला पैसा काढून घेतल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण काही काळ थांबले होते. त्यामुळे हा चित्रपट ठरल्या पेक्षा काही काळ उशीराने प्रदर्शित झाला होता.

Leave a Comment