असा असेल आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा तीन दिवसांचा विवाहसोहळा

akash-ambani

देशातील प्रथितयश उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या ईशाचा विवाह काही दिवसांपूर्वीच मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळा पार पडतो न पडतो तोच अंबानी परिवारामध्ये आणखी एका विवाहसोहळ्याची तयारी मोठ्या जोमाने सुरु झाली आहे. मुकेश आणि नीता यांचा मुलगा आकाश अंबानी आणि प्रसिद्ध हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका यांचा विवाह नऊ मार्चला होणार आहे. हा विवाह सोहळा तीन दिवस चालणार असून, प्रत्येक दिवशी निरनिराळे विधी केले जाणार आहेत.

akash-ambani1
विवाहसोहळ्या पूर्वी आकाश आपल्या मित्र मंडळींच्या समवेत स्वित्झर्लंडमधील सेंट मोरीत्झ येथे ‘बॅचलर पार्टी’ साजरी करणार आहे. या ठिकाणी आकाशाचे व त्याच्या पाहुण्यांचे वास्तव्य तीन दिवसांकरिता असणार आहे. या पार्टीसाठी पाचशे पाहुणे मंडळी उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. या पाहुण्यांना सेंट मोरीत्झ येथे नेण्या-आणण्यासाठी अंबानी परिवारातर्फे दोन चार्टर्ड विमाने आरक्षित करण्यात आली आहेत.


आकाश आणि श्लोकाचा प्रत्यक्ष विवाहसोहळा तीन दिवस चालणार असून, हा सोहळा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे पार पडणार आहे. पहिल्या दिवशी पारंपारिक ‘मंगल बारात’ असणार आहे. या दिवशी ‘मंगल बारात’ची सुरुवात ट्रायडेंट हॉटेल पासून होणार असून, दुपारी साडे तीन वाजता ही वरात विवाहाच्या नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी निघणार आहे. विवाहस्थळी पोहोचल्यानंतर सायंकाळी विवाहविधींना सुरुवात केली जाणार असल्याचे समजते.


दहा मार्च रोजी ‘मंगल पर्व’ विधी असून, हा विधी अंबानी परिवाराकडून केला जाणार आहे. या नंतर आयोजित केलेल्या आलिशान स्वागत समारंभासाठी बॉलीवूडमधील नामवंत सेलिब्रिटीज उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे देशातील आणि विदेशातील अनेक नामवंत उद्योगपती, राजकीय नेते देखील या स्वागतसमारंभासाठी उपस्थित असणार आहेत. अकरा मार्च रोजी आणखी एक स्वागत समारंभ मुंबईमधेच आयोजित केला गेला असून, याही समारंभास अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीज आणि देश विदेशातील नामवंत मंडळी उपस्थित असणार आहेत. हे सर्व समारंभ जियो वर्ल्ड सेंटर येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

Leave a Comment