घराची सजावट करताना ‘या’ गोष्टी अवश्य लक्षात ठेवाव्या

decorघर लहानसे असो, किंवा भले मोठे असो, ते आपल्याला आवडेल अशा पद्धतीने सजविणे प्रत्येकालाच मनापासून आवडत असते. घराच्या सजावटीमध्ये आपले व्यक्तिमत्व, आणि आपल्या आवडीनिवडी दिसून येत असतात. घराची सजावट करताना कोणत्या गोष्टी करायला हव्यात आणि कोणत्या गोष्टी अगत्याने टाळल्या जाव्यात हे समजून घेणे अगत्याचे ठरते. अनेक घरांमध्ये, त्यात राहणाऱ्या लोकांची वेगवेगळ्या निमित्ताने घेतलेली छायाचित्रे भिंतींवर लावलेली पहावयास मिळतात. या छायाचित्रांशी आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात हे जरी खरे असले, घराच्या सर्वच भिंतींवर लहानमोठ्या छायाचित्रांची गर्दी टाळावी. आपली छायाचित्रे प्रदर्शित करण्यासाठी ‘डिजिटल फोटोफ्रेम’चा पर्याय अतिशय सोयीचा ठरतो. त्यातूनही भिंतींवर काही छायाचित्रे लावायची झालीच तर ती मोजकी आणि शक्यतो एकसारख्या आकाराची आणि एकसारख्या फ्रेम्समध्ये असावीत.

decor1

घरामध्ये रंग देताना एकाच भिंतीला निराळा रंग देऊन ‘अॅक्सेंट वॉल’ बनविण्याची फॅशन सध्या चलनात आहे. सर्वच भिंतीना एकसारखा रंग देण्याची फॅशनही रूढ आहे. मात्र रंगसंगती निवडताना ती फार भडक, गडद असणार नाही याची काळजी घ्यावी. घरामध्ये भिंतींना दिलेला रंग डोळ्यांना भावेल असा असावा. भितींना दिलेला रंग जर हलका असेल, तर खोली अधिक प्रकाशमान वाटून खोलीचा आकार मोठा भासतो. याविरुद्ध जर भिंतींना गडद, भडक रंग दिले असतील, तर खोली अंधारी आणि लहान भासते. भिंतीच्या रंगाला जुळतील अशा रंगाच्या अॅक्सेसरीज्, म्हणजेच पडदे, फर्निचरची अपहोल्स्ट्री इत्यादी असावेत. आजकाल पडद्यांच्या ऐवजी ‘विंडो ब्लाइन्डस्’ ही लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे आवडत असल्यास पडद्याच्या ऐवजी ब्लाइन्डस् लावविण्याचा विचार करता येऊ शकेल.

decor3

घराची सजावट करताना नानाविध ट्रेंड्स फॉलो करण्याचा मोह टाळावा. आपल्या घराची सजावट ही आपली जीवनशैली, आपल्या आणि आपल्या परिवारजनांच्या गरजा, आपली व्यक्तिमत्वे आणि मुख्यतः आपली आवड लक्षात घेऊनच करावयास हवी. केवळ एखादी ट्रेंड चलनामध्ये आहे म्हणून त्या ट्रेंडचे अनुकरण टाळावे, तसेच आपले घर एखाद्या होम डेकोर कॅटलॉग प्रमाणे दिसावयास हवे हा अट्टाहासही टाळायला हवा. आपल्या घरामध्ये आपण सजावटीसाठी वापरत असलेल्या वस्तू सहज हाताळण्याजोग्या, सहज साफ करता येण्याजोग्या असाव्यात. अनेकांना ‘अँटीक’, म्हणजेच पुरातन वस्तूंचा सजावटीसाठी वापर करण्याची आवड असते. अशा अँटीक वस्तू घरामध्ये मांडताना वस्तूंची मांडणी काळजीपूर्वक करावी. सर्वच वस्तू एकदमच मांडण्याऐवजी थोड्याच वस्तू आकर्षक पद्धतीने मांडाव्यात. काही दिवसांनंतर या वस्तू काढून ठेऊन त्या ऐवजी आपल्या संग्रही असणाऱ्या इतर अँटीक वस्तूंची मांडणी करावी. अशा प्रकारे अँटीक वस्तूंमध्ये विविधता ही टिकविता येईल आणि मांडणीही आकर्षक दिसेल.

decor2

घराची सजावट करताना अनेकदा कृत्रिम फुलांचा वापर आढळून येतो. सुरुवातीला कृत्रिम फुले आकर्षक दिसत असली, तरी कालांतराने त्यांचे रंग ‘फेड’ होऊन ती फुले जुनाट दिसू लागतात. घरामध्ये फुलांची सजावट करायची असल्यास ताज्या फुलांची असावी. ताज्या फुलांची पुष्परचना अगदी लहानशी असली, तरी अतिशय आकर्षक दिसते.