निक जोनास परतणार ‘जुमानजी’ च्या पुढील भागात

nick-jonas-to
अमेरिकन पॉप गायक निक जोनासने ‘जुमानजी- वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामध्ये केलेली ‘जेफरसन (सीप्लेन) मॅकडोनो’ ची भूमिका खूप लोकप्रिय ठरली होती. लवकरच या चित्रपटाचा पुढला भाग येत असून, या भागातही निक पुन्हा एकदा ‘सीप्लेन’च्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘जुमानजी’च्या पुढल्या भागाचे कथानक गुप्त ठेवण्यात येत असून, निक सोबत ड्वेन जॉन्सन, जॅक ब्लॅक, केविन हार्ट, आणि कॅरन जिलीयन हे कलाकारही चित्रपटाच्या पुढील भागामध्ये दिसणार आहेत.

‘जुमानजी’च्या पुढील भागामध्ये हे सर्व कलाकार परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या वृत्ताला निक जोनासने ट्वीट द्वारे दुजोरा दिला आहे. निक आणि इतर कलाकारांच्या जोडीने डॅनी डेव्हिटो आणि डॅनी ग्लोव्हर यांच्या भूमिकाही या चित्रपटामध्ये असणार आहेत. ‘जुमानजी-वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामध्ये भूमिका केलेले चार नवतरुण, म्हणजेच सरडॅरियस ब्लेन, मॅडिसन आईजमन, मॉर्गन टर्नर, आणि अॅलेक्स वूल्फ हे ही चित्रपटाच्या आगामी भागामध्ये दिसणार आहेत.

‘जुमानजी’ चे दिग्दर्शक जेक कॅसडान हे याही चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून, चित्रपटाचे कथानक जेक, स्कॉट रोजेनबर्ग आणि जेफ पिंकर यांचे आहे. जुमानजीचा पुढील भाग असणाऱ्या या चित्रपटचे नाव अद्याप निश्चित झाले नसून, या वर्षीच्या शेवटी, म्हणजेच १३ डिसेम्बर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समजते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका आठवड्यातच ‘स्टार वॉर्स-एपिसोड ix’ प्रदर्शित होत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राशी काही दिवस आधीच विवाहबद्ध झालेल्या निक जोनासने नुकतेच ‘मिडवे’ आणि ‘केऑस वॉकिंग’ या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.