सान्या मल्होत्राची ऑनस्क्रिन आई बनणार विद्या बालन!

sanya-malhotra
आमिर खानच्या ‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात लहान गीता फोगटची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या खूप व्यस्त आहे. एका पाठोपाठ एक अशा चित्रपटाच्या आॅफर्स सान्याला मिळत आहेत. सान्याचा ‘पटाखा’ व ‘बधाई हो’ हे चित्रपट अलीकडे रिलीज झाले. ‘पटाखा’ला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पण सान्याच्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने धूम केली. सध्या सान्याच्या हातात ‘फोटोग्राफर’ आणि ‘मनमर्जिया’ हे दोन सिनेमे आहेत. याशिवाय आणखी एका चित्रपटात सान्याची वर्णी लागली आहे. सान्या या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालनला टक्कर देताना दिसणार आहे.

सान्याला रोनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी बॅनरखाली तयार होत असलेल्या चित्रपटासाठी साईन करण्यात आले आहे. ‘सुपर कंप्युटर’ म्हणून ओळखल्या जाणा-या महान गणितज्ञ शकुंतला देवी यांचा हा चित्रपट बायोपिक आहे. यात विद्या बालन शकुंतला देवीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. शकुंतला देवी यांना मानवी कॉम्प्युटरही म्हटले जायचे. कारण त्या कोणत्याही कॅल्क्युटरविना आकडेमोड करायच्या. अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. जगातील सगळ्यात वेगवान कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने 50व्या सेकंदाला 201चे 23चे वर्गमूळ काढत त्यांनी विक्रम रचला होता.

या चित्रपटातील तिची भूमिका काय असेल, तूर्तास हे गुलदस्त्यात आहे. तर शकुंतला देवींच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे. या बायोपिकचे शूटींग यावर्षी जून-जुलैमध्ये सुरु होणे अपेक्षित आहे. साहजिकच अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटासाठी सान्या कमालीची उत्सुक आहे. सान्या तशीही विद्या बालनची खूप मोठी चाहती असल्यामुळे तिच्यासोबत काम करण्याची संधी तिला सोडायची नव्हती. सान्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर ‘फोटोग्राफर’मध्ये ती नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.