टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान आमने-सामने येण्याची शक्यता कमी!

combo
मुंबई : आयसीसीने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहणाऱ्या दोन्ही देशातील असंख्य चाहत्यांची निराशा केली आहे. मंगळवारी (29 जानेवारी) आयसीसीने 2020 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाचा कार्यक्रम जाहीर केला. भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील उत्तम 8 संघ टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 राऊंडमध्ये थेट खेळणार आहेत.

दोन ग्रुपमध्ये या राऊंडमध्ये खेळणाऱ्या 12 संघांना विभाजित करण्यात आले आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात असल्यामुळे या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना नॉकआऊट सामन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

आयसीसी जागतिक टी-20 आंतरराष्ट्रीय संघाच्या रँकिंगमध्ये 31 डिसेंबर 2018 रोजी जे संघ टॉप 8 मध्ये आहे, सुपर 12 राऊंडमध्ये त्यांना 2020 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या थेट प्रवेश मिळाला आहे. पाकिस्तान 31 डिसेंबर 2018 रोजी रँकिंगमध्ये पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर असल्यामुळे दोघांना एका गटात ठेवलेले नाही. भारत आणि पाकिस्तान आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या साखळी फेरीत समोरासमोर न येण्याची 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतरची ही पहिलीच वेळ आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दहशतवादासह विविध मुद्द्यांवरुन तणावामुळे दोन्ही देशांमधील क्रिकेटचे सामने हे बऱ्याचदा आयसीसी आणि एशियन क्रिकेट काऊन्सिलद्वारे (एसीसी) आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्येच होतात. मागील वर्षी एसीसीने यूएईमध्ये आशिया चषकाचे आयोजन केले होते. भारताने तेव्हा पाकिस्तानविरोधात दोन सामने खेळले होते आणि दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता.

भारत आणि पाकिस्तान संघ टी-20 विश्वचषकात एकाच दिवशी पण वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळणार आहेत. सिडनीमध्ये 24 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानशी आहे. तर भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत पर्थमध्ये आहे. भारतीय वेळेनुसार सिडनीमधील सामना दुपारी 1.30 वाजता तर पर्थमधील सामना दुपारी 4.30 वाजता सुरु होणार आहे.

Leave a Comment