लग्नामध्ये निक जोनासने दिली प्रियांकाच्या बहिणीला अशी भेट

nick-jones
पंजाबी विवाहसोहळ्यामध्ये वधूच्या बहिणींनी वराचे जोडे चोरून ते लपवून ठेवायचे आणि ते जोडे परत मिळविण्यासाठी वराने वधूच्या बहिणींना पैसे भेट म्हणून द्यायचे असा रिवाज आहे. या परंपरेला ‘जुते छुपाई’ म्हटले जाते. किंबहुना ‘हम आपके है कौन’ या चित्रपटामध्ये ही परंपरा दाखविली गेल्यानंतर ही ‘जुते छुपाई’ची प्रथा इतकी लोकप्रिय झाली, की अनेक पारंपारिक विवाहसोहळ्यांमध्ये हा विधी समाविष्ट केला जाऊ लागला. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप गायक निक जोनास यांचा विवाह ख्रिश्चन आणि पंजाबी रिवाजांच्या नुसार पार पडला. पंजाबी रिवाजांच्यानुसार हा विवाहसोहळा पार पडत असता, याही सोहळ्यामध्ये जुते छुपाईची परंपरा पहावयास मिळाली.
nick-jones1
मात्र या विवाहसोहळ्यामध्ये जुते छुपाईची परंपरा काहीशी हटके रीतीने पार पडली असल्याचे अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने म्हटले आहे. परिणीती प्रियांकाची चुलत बहिण असून तीही या जुते छुपाईमध्ये सहभागी झाली होती. प्रियांकाच्या सर्व बहिणींनी मिळून निकचे जोडे लपविल्यानंतर त्याच्याकडे जोडे परत मिळविण्यासाठी पैशांची मागणी केली असता, निकने त्याच्या सर्व मेहुण्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. निकने प्रियांकाच्या सर्व बहिणींना पैशांच्या ऐवजी एक एक हिऱ्याची अंगठी भेट म्हणून दिली.
nick-jones2
इतकी बहुमूल्य भेट आपल्याला मिळेल अशी कोणाचीच अपेक्षा नसल्यामुळे परिणीतीच्या सर्व बहिणी अर्थातच आनंदून गेल्या. त्याचबरोबर निक हा ‘बेस्ट नवरा’ ठरणार असल्याची खात्रीही सर्वांना पटल्याचे परिणीती म्हणते. तसेच जोनास आणि चोप्रा परिवाराचे कायमचे संबंध जुळल्यानेही आपल्याला खूपच आनंद झाला असल्याचेही परिणीती सांगते. सध्या प्रियांका अमेरिकेमध्ये असून, तिच्या आगामी युट्युब सिरीजसाठी सुरु असलेल्या चित्रीकरणामध्ये ती व्यस्त आहे.

Leave a Comment