प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला पार्कर बोल्स यांच्या विवाहसोहळ्याविषयी काही रोचक तथ्ये

prince
ब्रिटनच्या राजघराण्याचे युवराज प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला पार्कर बोल्स यांची प्रतिमा आता ब्रिटनचे भावी राज्यकर्ते म्हणून कायम झाली असून, या दांपत्याबद्दल ब्रिटीश जनतेच्या मनामध्ये खूप प्रेम आणि आदर आहे. पण काही वर्षांपूर्वी परिस्थिती खूपच वेगळी होती. प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांची मैत्री खरेतर फार पूर्वीपासूनची होती. पण कॅमिला विवाहित असल्याने चार्ल्सला तिच्याशी विवाह करणे शक्य नव्हते. १९८२ साली चार्ल्स यांचा विवाह लेडी डायनाशी झाला. त्यानंतरही चार्ल्स आणि कॅमिलामधील मैत्री कायम राहिली. डायना आणि चार्ल्स यांच्या विवाहसंबंधांमध्ये नेहमीच कटुता राहिली असून, कॅमिला यामागील प्रमुख कारण मानली गेली होती. अखेर डायना आणि चार्ल्स यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर वर्षाच्या आतच डायनाचा कार अपघातामध्ये मृत्यू झाला. ब्रिटनमधेच नाही तर जगभरामध्ये डायना अतिशय लोकप्रिय असल्याने तिचा विवाह मोडण्यास कारणीभूत कॅमिलाला ठरविले गेले आणि त्यापायी ब्रिटीश जनतेचा भयंकर रोष तिला पत्करावा लागला. चार्ल्स आणि कॅमिला यांचा विवाह २००५ साली पार पडला खरा, पण तेव्हाही ब्रिटीश जनतेने या नात्याचा फारश्या आनंदाने स्वीकार केला नाही. अलीकडच्या काळामध्ये मात्र जनमत खूपच बदलले असून, कॅमिला आणि चार्ल्स यांची लोकप्रियता वाढत आहे. यांच्या विवाहाविषयीची काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.
prince1
चार्ल्स आणि कॅमिला यांचा विवाह रीतीनुसार चर्चमध्ये पार न पडता कोर्टामध्ये पार पडला, त्यानंतर चर्चमध्ये छोटीशी प्रार्थनासभा आयोजित केली गेली होती. राणी एलिझाबेथ कोर्टातील लग्नाला उपस्थित नसली, तरी चर्चमधील प्रार्थनासभेला मात्र राणी एलिझाबेथने पूर्ण परिवारासमवेत हजेरी लावली. तसेच विवाहानंतर आयोजित स्वागतसमारंभामध्ये राणी एलिझाबेथने छोटेसे भाषणही दिले. विवाहाच्या दिवशी कॅमिला पार्कर आजारी होती. तसेच तिच्या बद्दलचे जनमत आणि लोक तिचा स्वीकार प्रिन्स चार्ल्सची पत्नी म्हणून करतील किंवा नाही याच्या काळजीमुळे तिला आलेला मानसिक तणाव ही खूप मोठा होता. किंबहुना विवाहाच्या दिवशीच्या सकाळी कॅमिलाला बेडवरून खाली उतरण्याची ही शारीरिक ताकद नव्हती इतकी आजारी ती होती.
prince2
चार्ल्स आणि कॅमिला यांचा विवाह २००५ साली झाला असला, तरी ते एकमेकांच्या मुलांना आधीपासूनच ओळखत होते. किंबहुना यांनी एकमेकांच्या मुलांना अगदी लहान असतानापासूनच पाहिले असल्यामुळे विवाहानंतर मुले आपल्याला स्वीकारतील किंवा नाही हा चिंतेचा विषय कधीही नव्हता. विवाहानंतर कॅमिलाची औपचारिक उपाधी ‘प्रिन्सेस ऑफ वेल्स’ अशी झाली, पण ही उपाधी डायनाच्या नावाशी जोडली गेली असल्याने, या गोष्टीचा आदर ठेवीत कॅमिलाने या उपाधीच्या ऐवजी ‘डचेस ऑफ कॉर्नवॉल’ ही उपाधी तिच्या नावापुढे लावणे पसंत केले. चार्ल्स आणि कॅमिला यांचा विवाह वास्तविक आठ एप्रिल रोजी व्हायचा होता, पण त्यादिवशी रोमचे पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्यविधीसाठी चार्ल्स यांना उपस्थित राहावे लागले असल्याने हा विवाहसोहळा एका दिवसाने पुढे ढकलावा लागला होता.

Leave a Comment