रामायणाच्या काळापासून अनन्यसाधारण महत्व असलेले देवप्रयाग

Devprayag2
उत्तराखंड राज्यामध्ये असलेले देवप्रयाग प्रसिद्ध तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते. अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या पवित्र ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. देवभूमी मानल्या गेलेल्या उत्तराखंड राज्यातील पंच प्रयागांपैकी देवप्रयाग एक आहे. या ठिकाणाशी निगडित आख्यायिकेनुसार, जेव्हा राजा भगीरथाच्या प्रार्थनेनुसार गंगा पृथ्वीवर अवतरली, तेव्हा तिच्या सोबत तेहतीस कोटी देवही पृथ्वीवर अवतरले. सर्व देवता याच ठिकाणी अवतरल्याने या ठिकाणाला देवप्रयाग म्हटले जाते.
Devprayag
देवप्रयाग समुद्रसपाटीपासून ८३० मीटर उंचीवर असून, ऋषिकेशपासून देवप्रयागचे अंतर केवळ सत्तर किलोमीटर आहे. याच ठिकाणी मुनी देवशर्मा यांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कठीण तप केले असल्याची आख्यायिका आहे. या तपस्येनंतर भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन हे ठिकाण देवशर्मा मुनींच्या नावाने ओळखले जाईल असा वर दिला असता, या ठिकाणाचे नाव देव प्रयाग पडले असल्याची कथा आहे.
Devprayag1
पौराणिक मान्यतेनुसार देवप्रयाग या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी तपस्या केली असून, लंकेहून रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येला परतण्याआधी ही तपस्या रामांनी केली असल्याचे म्हटले जाते. रावणाचा वध केल्यानंतर ब्राह्मणवधाच्या पापातून मुक्ती मिळविण्याकरिता प्रभू रामचंद्रांनी ही तपस्या केली असे म्हणतात. ही तपस्या ज्या शिलेवर बसून केली गेली, ती शिला आजही या ठिकाणी पहावयास मिळते. या शिलेचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येत असतात.

देवप्रयागमध्ये गंगेच्या मंदिराजवळच भगवान हनुमानाची गुहा आहे. भगवान रामचंद्र या ठिकाणी तपस्या करीत असताना हनुमान या गुफेमध्ये राहिले असल्याची कथा असल्याने भाविक या गुफेचे दर्शन घेण्यास येत असतात. येथील नयनरम्य निसर्ग आणि शांत वातावरण भाविकांना मन:शांती देणारे आहे.