मोदींनी दाखवला पवारांबद्दलचा ‘सॉफ्ट कॉर्नर’

narendra-modi
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल आपल्याला व्यक्तिगत आदर असून जनतेसाठी पवार यांनी काम केले. पण पवार यांची चूक एवढीच होती की, पवारांनी काँग्रेसमध्ये असताना अध्यक्षपदासाठी प्रयत्न केला तर त्यांचा अपमान करत त्यांना काँग्रेसने पक्षातून थेट बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांना ज्या काँग्रेसने पक्षाबाहेर काढले आज पवार साहेब त्याच काँग्रेससोबत पुन्हा गेले याची खंत वाटते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल(दि.23) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, नंदुरबार येथील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना शरद पवार यांच्याबद्दल टिप्पणी करत काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते मेरा बुथ, सबसे मजबुत या उपक्रमात बोलत होते.

मोदी यांनी आपल्या संवादाची सुरुवात मराठीतून करत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. पंतप्रधान मोदी यांनी या संपूर्ण संवादादरम्यान पवार यांच्यावर टीका करणे टाळले. उलट पवार अपमान करणाऱ्या काँग्रेसच्याच तंबूत आहेत. तसेच पवार यांनी जनतेसाठी काम केल्याचे सांगत सहानुभूती दर्शविली. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी बारामतीच्या भेटीत ज्येष्ठ नेते पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे सांगत पवार यांच्यासोबतचे मैत्रीचे संबंध जाहीर केले होते. यापूर्वी बारामतीत दोन वेळा पंतप्रधान मोदी येऊन गेले आहेत. त्यामुळे शरद पवारांवर ते टीका करतील अशी शक्यता नव्हतीच पण टीका न करता त्यांना फक्त त्यांच्या काँग्रेसमध्ये झालेल्या अपमानाची आठवण करुन देत मोदींनी पवारांबद्दलचा ‘सॉफ्ट कॉर्नर’ दाखवल्याची चर्चा आहे.

Leave a Comment