लवकरच तुमच्या भेटीला येत आहे मौलाना आझाद यांचा प्रेरणादायी चरित्रपट

maulana-azad
लवकरच मौलाना आझाद यांच्या जीवनावर आधारित ‘वो जो था एक मसीहा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या चित्रपटात लीनेश फणसे मौलाना आझाद यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय या जीवनपटात सुधीर जोगळेकर, आरती गुप्ते, डॉ राजेंद्र संजय, अरविंद वेकारीया, शरद शहा, केटी मेंघानी, चेतन ठक्कर, सुनील बळवंत, माही सिंग, चांद अन्सारी आणि वीरेंद्र मिश्रा हे प्रमुख कलाकार भूमिका साकारणार आहेत.

‘वो जो था एक मसीहा’ हा चित्रपट येत्या 18 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. यात प्रेक्षकांना मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जीवन संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यांचा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील सहभाग अत्यंत प्रेरणादायी होता. त्यांनी देशभक्त म्हणून अरबिंदो घोष यांच्या क्रांतिकारी संघटनेचे सक्रिय सदस्यत्व स्वीकारले होते.

याशिवाय त्यांनी पत्रकार म्हणून ‘अल हिलाल’ आणि ‘अल बलाह’ ही दोन मासिके चालविली आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. ती एवढी लोकप्रिय झाली, की भीतीपोटी ब्रिटीश सरकारने ती दोन्ही प्रकाशने बंद केली आणि कलकत्ता येथून मौलाना आझाद यांना हद्दपार केले. रांची येथे त्यांना नजरबंद करून ठेवण्यात आले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी अनेकदा तुरुंगवास सहन केला. 1923मध्ये वयाच्या 35व्या वर्षी ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. स्वतंत्र हिंदुस्थानाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय दाखल केले. संपूर्ण आयुष्य हिंदू-मुस्लिमांच्या एकजुटीसाठी वेचले. त्यांचा हाच संघर्ष ‘वो जो था एक मसीहा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment