पॅरिसचे पहिले न्यूड रेस्टॉरंट पडले बंद

restaurant
पॅरिस – गतवर्षीच फ्रान्सच्या राजधानीत उघडलेले पहिले न्यूड रेस्टॉरंट आता बंद पडले असून या ठिकाणी येणाऱ्या कुठल्याही ग्राहकाला कपडे (अंतर्वस्त्र सुद्धा) घालण्याची परवानगी नव्हती. यात कपडे घातलेल्यांना प्रवेश दिला जात नव्हता. सोबतच, फक्त फोन किंवा ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांनाच येथे जागा दिली जात होती. पण या ठिकाणी कालांतराने ग्राहकांची संख्या कमी झाली. गेल्या काही महिन्यांपासून या रेस्टॉरंटमध्ये कुणीच येत नव्हते. मालकाने अखेर रिकाम्या खुर्च्या पाहून आपले ‘दुकान’ बंद करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी पॅरिसमध्ये उघडलेल्या या रेस्टॉरंटचे नाव O’ Natural असे होते. त्याची सुरुवात माइक आणि स्टेफनी यांनी केली. फ्रान्समध्ये हा बिझनेस मोकळेपणाला प्रोत्साहित करेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. यासंदर्भात फ्रान्सच्या द लोकल या ऑनलाइन दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, टीकाकारच नव्हे, तर लोकांना सुद्धा ही संकल्पना आवडली नाही. एका महिलेने दैनिकाशी संवाद साधताना सांगितले, की न्युडिटी बीचवर सामान्य बाब आहे. लोकांना त्या ठिकाणी कपडे नाही घातल्याबद्दल काहीच वाटत नाही. परंतु, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये सगळेच कपडे काढून अनोळखी लोकांसमोर खात बसणे हे खटकणारे आहे. तर काहींनी या हॉटेलच्या अटी-शर्तींना दोष दिला.

या रेस्टॉरंटमध्ये येण्यापूर्वी लोकांना रितशीर आरक्षण करावे लागत होते. प्रवेश देण्यापूर्वीच ग्राहकांना एक वॉर्निंग दिली जाते, की हे एक जेवण्याचे ठिकाण आहे. येथे अश्लीलता चालणार नाही. रेस्टॉरंटमध्ये प्रवेश घेताच त्यांना थेट रेस्टरूममध्ये पाठवले जाते. तेथे ग्राहकांना आपले सर्व कपडे काढून ठेवावे लागतात. ग्राहकांना येथे अंडरगार्मेंट सुद्धा घालण्याची परवानगी नाही. प्रत्येक ग्राहकाला कागदाच्या चपला दिल्या जातात. परंतु, स्थानिकांना ही संकल्पना पटली नाही.