हार्दिक पांड्याने बीसीसीआयच्या नोटिसीला दिले उत्तर

hardik-pandya
मुंबई : कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या ओघात पांड्याने महिलांबद्दल विवादास्पद वाक्य केले. त्यानंतर महिलांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या पांड्याला नेटिझन्सने चांगलेच झोडपले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पांड्यावरील वाढता रोष लक्षात घेता पांड्या व राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 24 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले. बीसीसीआयच्या नोटीसीला पांड्याने लगेचच उत्तर दिले. त्या विधानाबद्दल त्याने बीसीसीआयची मनापासून माफी मागितली.

या दोघांना कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले असता कुटुंबीय खुलेपणाने माझ्या सेक्स लाइफबद्दल चर्चा करतात असे हार्दिकने उत्तर दिले. तो पुढे म्हणाला, आई-बाबांबरोबर एकदा एका पार्टीला गेलो होतो तेव्हा तेथे उपस्थित कोणत्या मुलीबरोबर शरीर संबंध झाल्याचे त्यांनी मला विचारले. मी त्यावेळी अनेकींकडे बोट दाखवले. मी पालकांना आपले कौमार्य गमावल्याबद्दलही अगदी कूलपणे सांगितले. मी घरी आल्यावर पालकांना आज मी करुन आलो, असेही मी सांगतो.


नेटिझन्सने पांड्याच्या या बिनधास्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. पांड्याने त्यानंतर इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला, माझ्या कॉफी विथ करण या कार्यक्रमातील वक्तव्यामुळे कोणाची मने दुखावली असतील, तर त्यांची मी माफी मागतो. मला कोणालाही दुखवायचे नव्हते.

पण, या प्रकरणाची दखल घेत बीसीसीआयनेही पांड्यावर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आणि दोघांनाही नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना पांड्या म्हणाला की, दिलखुलास गप्पांचा हा कार्यक्रम होता आणि मी त्या ओघात विधान करून गेलो. मला त्या विधानाचे गांभीर्य नंतर समजले. माझी चूक मला उमगली आणि मी बीसीसीआयची मनापासून माफी मागतो. त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांचीही मी माफी मागतो.